⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

चार गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह आरोपी जेलबंद

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी चार गावठी पिस्तूल आणि पाच जिवंत काडतुसांसह २० वर्षीय तरुणाला भुसावळात पकडले. दीपसिंह गुरुमुखसिंह कलानी असे संशयिताचे नाव असून, तो खरगोन जिल्ह्यातील रहिवासी आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना शस्त्र तस्कराबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांना कारवाईचे आदेश दिले होते. बसस्थानकाजवळील रेल्वे हेरीटेजवळून रविवारी रात्री 10.24 वाजेच्या सुमारास संशयीत दीपसिंह कलाणी यास ताब्यात घेवून बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले. पंचांसमक्ष संशयीताकडील पांढर्‍या रंगाच्या पिशवीतून चार गावठी कट्टे जप्त करण्यात आले तसेच संशयीताच्या अंग झडतीतून पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

एकाचवेळी चार कट्टे जप्त
शहरात गावठी कट्टा विक्रीसाठी आणल्याची व बाळगल्याची बाब नवीन नाही मात्र एकाचवेळी तब्ल चार कट्टे सापडल्याची घटना प्रथमच उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संशयीत कलाणी याच्या ताब्यातून प्रत्येकी 25 हजार रुपये किंमतीचे चार कट्टे तसेच तीन हजार 500 रुपये किंमतीचे पाच पितळी काडतूस, दोन हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन तसेच 850 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्रशांत परदेशी यांच्या फिर्यादीनुसार संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाईल चोरटे जाळ्यात ः 77 हजारांचे मोबाईल जप्त
बसस्थानकाजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून संशयास्पद हालचालीवरून दोघा मोबाईल चोरट्यांना अटक करण्यात आली. संशयीतांच्या ताब्यातून 77 हजार रुपये किंमतीचे दहा अ‍ॅन्ड्राईड फोन जप्त करण्यात आले असून चोरट्यांनी ते नागरीक तसेच प्रवाशांकडून लांबवल्याची शंका आहे. शेख रहिमोद्दीन शेख कमरोद्दीन (34, रजा टॉवरजवळ, पापा नगर, भुसावळ) व शायबाज खान रमजान खान (21, फैजपूर, ता.यावल) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. संशयीतांविरोधात भादंवि 124 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंदक्रांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक हरीष भोये, एएसआय शरीफ काझी, हवालदार रमण सुरळकर, नाईक निलेश चौधरी, नाईक उमाकांत पाटील, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई प्रशांत सोनार, शिपाई दिनेश कापडणे, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हे देखील वाचा :