प्रशासनाची दिरंगाई, कर्मचाऱ्याच्या राजकीय वरदहस्तामुळे गेला बीडीओंचा बळी!

Yawal News । जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी रिक्त असलेल्या पदावर जळगाव जिल्हा परिषद कार्यालयातील ग्रामपंचायत सहाय्यक गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांची तात्पुरत्या पद्धतीने दि.१७ रोजी पदस्थापना महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव सु.दे. आंबेकर यांनी केली होती. आठ दिवस होऊन देखील गायकवाड हजर झाल्या नसल्याने एकनाथ चौधरी यांच्याकडे पदभार कायम होता. एकनाथ चौधरी यांनाच यावल येथे कार्यरत ठेवण्यासाठी एक राजकीय पदाधिकारी इच्छुक असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. प्रशासनाने वेळीच दखल घेत दिरंगाई केली नसती तर कदाचित एकनाथ चौधरी यांचा बळी गेला नसता असे म्हटले जाते आहे.

यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी रिक्त पदी जळगाव जिल्हा परिषद कार्यालयातील ग्रामपंचायत सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती मंजुश्री गायकवाड यांची तात्पुरत्या पद्धतीने पदस्थापनादि.१७ रोजी महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव सु.दे. आंबेकर यांनी केली होती. आठ दिवस झाले तरी श्रीमती गायकवाड या यावल पंचायत समिती कार्यालयात हजर झाल्या नाही. थेट मंत्रालयातून ऑर्डर असताना गायकवाड यांना हजर होऊ न देण्यासाठी आणि मयत एकनाथ चौधरी हेच यावल येथे बीडिओ म्हणून कार्यरत राहण्यासाठी यावल पंचायत समिती कार्यालयात एक राजकीय पुढारी ठाण मांडून बसत होता अशी चर्चा आता समोर येत आहे. एकनाथ चौधरी यांची नियुक्ती यावल येथेच राहिली आणि अपघातात त्यांचा बळी गेला. एकनाथ चौधरी यांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण? याचे जि.प.सिईओ यांनी शासकीय कर्तव्य म्हणून आत्मचिंतन करीत नि:पक्षपणे कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. दोषींवर कारवाई हीच एकनाथ चौधरी यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे.

श्रीमती गायकवाड या मागील काही महिन्यापूर्वी यावल पंचायत समिती प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. नेमके त्याच वेळी राजकीय वजन असलेला पंचायत समिती कार्यालयातील एका कर्मचारी मुद्दाम कामात हस्तक्षेप करीत असल्याची चर्चा होती. गटविकास अधिकाऱ्यांनी देखील कार्यालयीन कामकाजाबाबत त्यावर अविश्वास व्यक्त केला होता. श्रीमती गायकवाड आता पुन्हा गटविकास अधिकारी म्हणून आल्यानंतर पंचायत समितीमधील त्या कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार निर्णय घेतले जाणार नाहीत या हेतूसह अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

यावल पंचायत समिती कार्यक्षेत्रात काही कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून अनेक पदावर ठाण मांडून आहेत. राजकीय वरदहस्त असल्याने अशा कर्मचाऱ्यांकडे यावल पंचायत समिती व जि.प. जळगाव कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे देखील कर्तव्यात कसूर असताना दुर्लक्ष होत आहे. बीडीओ एकनाथ चौधरी यांच्या मृत्यूनंतर समय- सूचकता बाळगून एकाच ठिकाणी ठाण मांडून असलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

यावल तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झालेल्या माहिती अर्जाची प्रकरणे प्रथम अपिल म्हणून तसेच इतर अनेक योजनांची कामे निकृष्ट प्रतीची झालेली असल्याच्या तक्रारी व इतर काही महत्त्वाच्या तक्रारी यावल पंचायत समिती कार्यालयात प्रलंबित आहेत. या तक्रारी वेळेवर गटविकास अधिकारी यांच्यासमोर संबंधित कर्मचारी आपल्या वैयक्तिक हेतू साध्य करण्याच्या उद्देशाने सादर करीत नसल्याने किंवा प्रकरणांचा निपटारा वेळेवर करीत नसल्याने तालुक्यात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. काही प्रकरणे नाशिक माहिती आयुक्ताकडे दाखल झाल्याने त्या ठिकाणी तारखेवर हजर राहण्यासाठी ज्या अधिकाऱ्याचा काडी मात्र संबंध नव्हता त्या अधिकाऱ्याचा बळी गेल्याने याला जबाबदार कोण? हा प्रश्न उपस्थित होत आहे.