जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२१ । पारोळा तालुक्यातील टेहू येथिल सैन्य दलातील जवान सुटीवर घरी आले होते. त्यांच्या दुचाकीचा ९ रोजी रात्री अपघात झाला होता. धुळे येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान जवानाचा रविवारी रात्री मृत्यू झाला. नंदू संजय पाटील (वय ३०) असे या जवानाचे नाव असून आज मंगळवारी जवानावर शासकीय इतमामात टेहू येथे दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
जवान नंदू पाटील हे दहा वर्षापासून सैन्य दलात नायक पदावर कार्यरत होते. २१६ बटालियनमध्ये ते सध्या जबलपूर येथे देशसेवा करत होते. ते ८ रोजी सुटीवर आपल्या मूळ गावी आले होते. ९ रोजी वाघरे (ता.पारोळा) येथे आपल्या नातेवाईकांकडे कार्यक्रमानिमित्त जात होते. टेहू-वाघरे रस्त्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने, त्यांच्या दुचाकीला हुलकावणी दिली. त्यामुळे दुचाकीवरून पडल्याने ते जखमी झाले होते. त्यांना धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादम्यान १२ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
त्याच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण पारोळा तालुक्यात संपूर्ण परिरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन व चार वर्षाचे दोन मुले आहेत. तसेच एक अविवाहित भाऊ असून ते देखील सैन्यदलात नोकरीला आहेत.