जळगाव लाईव्ह न्यूज | १५ एप्रिल २०२३ | जळगाव शहरातील खड्डेमय रस्ते, शहरातून जाणारे महामार्ग आणि सुसाट वाहनांमुळे अपघात होण्याच्या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. जर आपण आकडेवारी पाहिली तर दररोज किमान १ किंवा २ जणांचा अपघातात मृत्यू होतो. जळगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय विभागाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२२ यादरम्यान एकूण ८४३ रस्ते अपघात झाले. त्यात एकूण ५६४ व्यक्तींचा मृत्यू झाला, तर ७१९ जण जखमी झाल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
जागतिक बँकेच्या मते, जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात. जगभरातील वाहनांपैकी फक्त एक टक्का वाहने भारतात आहेत, मात्र जगातील एकूण रस्ते अपघातांपैकी एकूण ११ टक्के मृत्यू भारतात होतात. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक रस्ते अपघात राष्ट्रीय महामार्गांवर होतात. रस्त्यांच्या दुरवस्थेबरोबरच बेदरकारपणे वाहन चालवणे हेही अपघातांचे प्रमुख कारण आहे. ओव्हर स्पीडिंग हे देशातील रस्ते अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. आपल्या जळगाव जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचे म्हटल्यास, येथे अपघात व त्यात मृत्यू होण्याचे प्रमाणे दिवसेंदिवस वाढत आहे.
अतिवेगाने वाहन चालविणार्या १ हजार १९२ जणांवर कारवाई
आरटीओने गेल्या वर्षभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुध्द दंडात्मक कारवाई करत तब्बल ७ कोटी ३५ लाख ४० हजार रुपयांची दंडवसुली केली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. विनापरवाना चालविणार्या दोन हजार १३५, परवाना नसलेल्या ३९४, योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या तीन हजार ५५८, पीयूसी नसलेल्या दोन हजार ९९९, अवैध प्रवासी वाहतूक करणार्या ८९८, अवैध प्रवासी वाहतूक करणार्या १६५ लक्झरी बस, अशा एकूण दहा हजार १४९ वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली.
पथकाच्या कारवाई अंतर्गत दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न करणे चार हजार ४७१, सीटबेल्ट न वापरणे एक हजार १२५, वाहन चालविताना मोबाईलचा वापर ७२२, विमा प्रमाणपत्र नसणार्या तीन हजार ३३५, अतिवेगाने वाहन चालविणार्या १ हजार १९२, मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणार्या १७०, मालवाहू वाहनातून जादा भार करणार्या ८७८ व लाल परावर्तक नसणार्या दोन हजार २८०, टपावरून मालाची वाहतूक करणार्या लक्झरी बस १३, अशा एकूण १४ हजार १८६ वाहनावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.