⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

Major Accident : नशिराबादजवळ ५ ठार, उड्डाणपुलावरून तिघे जखमी कोसळले

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जून २०२१ । जिल्ह्यातील अपघाताची मालिका सुरूच असून अमावस्याच्या सरतेशेवटी नशिराबादजवळ एक विचित्र अपघात घडला आहे. सिमेंट फॅक्टरीच्या समोर रेल्वे पुलावर जळगावकडून भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या दोन मालवाहू वाहनांवर भुसावळ करून येणारा भरधाव ट्रक धडकल्याने चौघे जागीच ठार झाले तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अपघात इतका भयंकर होता की, मालवाहू वाहनातील नागरिक उड्डाण पुलावरून खाली कोसळले तर ट्रक उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीवर चढलेला होता. (Accident Near Nashirabad Jalgaon)

जिल्ह्यातील अपघातांची मालिका सुरूच असून दररोज कुठे ना कुठे अपघातात कुणाला तरी जीव गमवावा लागतो आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास नशिराबाद ते साकेगाव दरम्यान सिमेंट फॅक्टरीजवळ रेल्वे उड्डाणपुलावर भयंकर अपघात झाला. जळगावकडून बुधवारी सकाळी बकऱ्या घेऊन मालवाहू पीकअप क्रमांक एमएच.४३.एडी.१०५१ व एमएच.४३.बीबी.००५० हे भुसावळच्या दिशेने जात होता. सिमेंट फॅक्टरी ते डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयजवळ रेल्वे उड्डाणपुलावर वळणावर समोरून येत असलेल्या ट्रक क्रमांक एमपी.०९.एजी.९५२१ ने त्यांना जोरदार धडक दिली.

अपघात इतका भयंकर होता की चौघांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत तीन जण उड्डाणपुलावरून थेट खाली कोसळले. दोन्ही मालवाहू चक्काचूर झाल्या असून एक मालवाहूची ट्रॉली ट्रकला चिकटली होती. मयत आणि दोन्ही जखमींना तात्काळ डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक किरण मोरे, उपनिरीक्षक राजू साळुंखे, महामार्ग वाहतूक पोलीस विभागाचे सहाय्यक निरीक्षक सुनील मेढे, उपनिरीक्षक राजेंद्र सोनवणे, सहाय्यक फौजदार सुनील पाटील, किरण हिवराळे, अनिल सपकाळे, पवन देशमुख, हितेश पाटील, दीपक पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविले. तसेच क्रेनच्या साहाय्याने वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

यांचा मयतांमध्ये समावेश
समजलेल्या माहितीनुसार, या अपघातात अकिल शेख गुलाब खाटीक (40, ईस्लामपूरा, फैजपूर), नईम अब्दुल रहिम खाटीक (62, तांबापुरा, जळगाव), शेख फारूक शेख मजीद (42, हकीम नगर, भडगाव तालुका), जुनेद सलीम खाटीक (18, भडगाव) यांचा समावेश आहे तर अन्य 12 जण अपघातात जखमी झाले आहेत. अपघातातील मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असून जखमींवर गोदावरी व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून या अपघातात ट्रक चालकही जखमी झाला आहे.

तिहेरी अपघात चौघे ठार
बुधवारी फैजपूर येथील बाजार असल्याने जळगाव व नशिराबाद येथून बकर्‍या घेवून विक्रेते बोलेरो पीकअप वाहन (क्रमांक एम.एच.43 ए.डी. 1051) भुसावळच्या दिशेने येत असताना समोरून येणार्‍या भरधाव ट्रक (क्रमांक एम.एच.09 एच.जी.9521) ने धडक दिल्यानंतर ट्रक उड्डाणपुलावरील पिलरला धडकला तर त्याचवेळी भुसावळच्या दिशेने येणार्‍या पिकअप (एम.एच.43 बी.बी.0050) ला ट्रकची जबर धडक बसल्याने दोन्ही वाहने चक्काचूर झाली तर वाहनातून बकर्‍या विक्रीसाठी येणार्‍यांपैकी चौघे जागीच ठार झाले तर अन्य 12 जण जखमी झाले. जखमींवर तातडीने गोदावरी रुग्णालयात उपचार करण्यात आले.