bodwad news-जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२२ । बोदवड-मलकापूर रस्त्यावरील वरखेड खुर्द गावाजवळ भरधाव चारचाकीव व दुचाकीत समोरासमोर धडक झाली. हा अपघात रविवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात दोघे तरुण गंभीर जखमी झाले. या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
भोकरदन तालुक्यातील रोहन केशव भोंबे (28) व सोमनाथ भोंबे (20) दुचाकी (एम.एच.20 सी.ज.5873) द्वारे बोदवडकडे येत असताना मलकापूरकडे जाणारी मारोती वॅगन आर (क्रमांक एम.एच.12 ई.टी.2877) ला समोरा-समोर धडक बसल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलवरील दोघेही युवक गंभीर जखमी झाले. अपघाताबाबत बाबत वरखेड येथील शिवसैनिकांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना माहिती दिल्यानंतर आमदारांनी बोदवड नगराध्यक्ष आनंदा पाटील यांच्याशी संपर्क साधून अपघातग्रस्तांना मदत करण्याचा सूचना दिल्या. नगराध्यक्ष पाटील यांनी तत्काळ गोलू बरडीया, हर्षल बडगुजर, कलीम शेख यांना सोबत घेऊन नगरपंचायतीच्या रुग्णवाहिकेने बोदवड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले तर जखमीच्या नातलगांनी दोघेही जखमींना बुलढाणा येथे पोहचून देण्याची विनंती केल्याने शिवसैनिक हर्षल बडगुजर, गोलू बरडीया, राहुल घाटे यांनी जखमींना बुलढाणा येथे त्यांच्या नातेवाईकांकडे रवाना झाले.
रोहन भोंबे याचा हात व पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे व डोक्याला थोडा मार लागल्याने त्याच्यावर बुलढाणा येथे उपचार सुरू आहेत तर सोमनाथ भोंबे यास डोक्यास गंभीर मार असल्याने त्यास नातलगांनी पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे दाखल केले आहे. अपघातग्रस्तांच्या नातलगांनी शिवसैनिकांचे व आमदार चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. अपघाताबाबत जखमी युवक जबाब देण्याच्या अवस्थेत नसल्यामुळे या प्रकरणी बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.