जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२२ । यावल तालुक्यातील किनगाव ते चिंचोली दरम्यान एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ३० वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. मृत तरुण हा कुटुंबातील कर्ता मुलगा हाेता. त्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे चिंचोली गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पांडुरंग सुखदेव मिस्तरी (वय ३०) रा.चिंचोली असे मृत तरुणाचे नाव आहे. अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावर किनगाव व चिंचोली ही गावे आहेत. या दोन्ही गावांच्या दरम्यान असलेल्या रस्त्यावरून किनगाव येथे मिस्तरी काम आटोपून चिंचोली येथील रहिवासी पांडुरंग मिस्तरी हा दुचाकी (क्र.एमएच ३९ बी ३१३९) वरून चिंचोलीला घरी परतत होता. दरम्यान साडेचार वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. झालेल्या या अपघातात पांडुरंग मिस्तरी हा जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच किनगावचे सरपंच भूषण पाटील, संजय पाटील, होमगार्ड संजय साळुंखे, अनिल साळुंखे, रवी चौधरी, रवी कोळी हे घटनास्थळी धावले.
तसेच यावल पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांनी आपल्या कर्मचारी सोबत तात्काळ घटनास्थळ गाठुन रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुरळीत करून मृतदेह यावल येथे शवविच्छेदन पाठविण्यासाठी मदत केली. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.