जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२२ । सिल्लाेड तालुक्यातील उंडणगाव येथील डॉक्टर व मेडिकल चालक हे आपल्या मित्राच्या लग्नाला शिरपूर येथे गेले हाेते. दुपारी लग्न आटाेपून शिरपूरहून चोपड्याकडे येताना अकुलखेडा जवळील पुलावर अचानक कारचे टायर फुटून गाडीतील एक जण जागीच ठार तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना साेमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली.
उंडणगाव येथील डॉ. ज्ञानेश्वर रामदास पाटील (वय ५०) हे त्यांच्या सोबत असलेल्या फार्मासिस्ट मधुकर ईश्वर धनमई (वय ३१) हे मित्राचा लग्नानिमित्त शिरपूर येथे आले होते. दुपारी लग्न आटोपून ते कार (एमएच- २०, ईई- ३२९५) ने शिरपूरहून चोपड्याकडे येत हाेते. शिरपूर रस्त्यावरील काझीपुरा फाट्याच्या नजीक पुलाचे काम सुरू असून त्या पुलावरून गाडी जाण्याच्या अगोदरच त्यांच्या कारचे टायर फुटून ही गाडी पुढे पुलाचा कठड्याला ठोकली गेल्याची घटना दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. या गाडीचा बलून (एअर बॅग) चालकाच्या बाजूने बसलेल्या मधुकर ईश्वर धनमई यांना जोरात लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर या अपघातात डॉ. ज्ञानेश्वर रामदास पाटील हे गंभीर जखमी झाले.
अपघाताच्यावेळी चालक डॉ. ज्ञानेश्वर पाटील व मधुकर धनमई या दोघांनी सीट बेल्ट लावलेले होते. या अपघातात डॉ. ज्ञानेश्वर पाटील यांना एअर बॅगचा लाभ झाला. तर फार्मासिस्ट मधुकर धनमई यांना मात्र एअर बॅग जोराने लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्या मित्रांनी दिली.