⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | दोन्ही खासदारांनी रेल्वे प्रवाशांना सोडले वार्‍यावर; ‘या’ महत्वाच्या बैठकीला दांडी

दोन्ही खासदारांनी रेल्वे प्रवाशांना सोडले वार्‍यावर; ‘या’ महत्वाच्या बैठकीला दांडी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२२ । जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या महत्वाच्या मागण्यांपैकी एक म्हणजे, गत अडीच वर्षांपासून बंद असलेल्या भुसावळ- नाशिक देवळाली शटल, मुंबई-भुसावळ पॅसेंजर व हुतात्मा एक्सप्रेस या प्रवाशी गाड्या. या गाड्या कधी सुरु होणार? या प्रश्‍नावर दोन्ही खासदारांचे ठरलेले एकच उत्तर म्हणजे, प्रस्ताव पाठविला असून पाठपुरावा सुरु आहे. मात्र आपले दोन्ही खासदार रेल्वे प्रवाशांबाबत किती बेफिकीर आहेत, याचं बिंग नुकतेच फुटले आहे.

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी नागपूर येथे, ६ जूनला भुसावळ व नागपूर विभागातील खासदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. विभागातील रेल्वेच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक झाली. मात्र या बैठकीला जळगावचे खासदार उन्मेष पाटील व रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे या दोन्ही खासदारांनी दांडी मारली. यामुळे भुसावळ विभागातील रेल्वे संबंधीत महत्वाचे प्रश्‍न चर्चेलाच आले नाहीत.

जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टीने सर्वात महत्वाची मागणी म्हणजे, नाशिक देवळाली शटल व मुंबई-भुसावळ पॅसेंजर या दोन गाड्या सुरु होणे. कारण या दोन्ही गाड्या सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी, नोकरदार व चाकरमन्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या गाड्या आहेत. चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ येथून जळगावला दररोज हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या मार्गावर चाकरमन्यांची संख्यादेखील अधिक आहे. गत अडीच वर्षांपासून नाशिक शटल बंद असल्याने नोकरदारांचे हाल सुरू आहेत. सर्वसामान्य प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. जर दोन्ही खासदार नागपूर येथील बैठकीला उपस्थित असते तर हा प्रश्‍न चर्चेला येवून त्यावर निश्‍चितपणे मार्ग निघाला असता. मात्र खासदारांच्या अनुपस्थितीमुळे हा विषय जैसे थेच राहिला आहे.

बैठकीत धुळे येथील खासदार सुभाष भामरे यांनी मालेगाव रोडवरील गेट क्र. २२ येथे आरओबी बांधून धुळे ते मुंबई १८ डब्यांची ट्रेन सुरू करण्याची सूचना केली. खासदार डॉ. विकास महात्मे यांनी नागपूर भुसावळ इंटरसिटी एक्सप्रेस (२२११२) पुन्हा सुरू करण्याची सूचना केली. छत्तीसगड एक्सप्रेस (१८२३७) आणि संघमित्रा एक्सप्रेस (१२२९६) यांचा पांढुर्णा स्थानकावरील थांबा पुन्हा सुरू करण्याची सूचना केली.

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.