जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात महिलांची फसवणूक करणाऱ्या घटनांमध्ये वाढ होत असताना चाळीसगावातही धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका तरुणाने मैत्रीच्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणीशी जवळीक साधत तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करत तब्बल ८ लाख १२ हजार रुपये आणि ९० ग्रॅम सोने उकळल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील २४ वर्षीय तरुणी एमडीएसचे शिक्षण घेत आहे. २०२२ पासून संशयित यश महेंद्र जैन याच्याशी तिची ओळख झाली होती. पुढे या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. काही काळानंतर आरोपीने तरुणीला भेटण्याची मागणी केली. मात्र, तरुणीने नकार दिल्यानंतर त्याने व्हिडिओ कॉलदरम्यान काढलेले तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.

धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणीकडून आरोपीने वेळोवेळी मोठी रक्कम उकळली. इतकेच नव्हे तर तिच्याकडून ८ लाख १२ हजार रुपये रोख आणि ९० ग्रॅम सोनेही घेतल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपीने तरुणीला मारहाण केल्याचाही आरोप आहे.
पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपीचे कॉलेज परिसरात आईस्क्रीम पार्लर असल्याची माहिती समोर आली असून या प्रकारात इतर मुलींचीही फसवणूक झाली आहे का, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.











