सोमवार, डिसेंबर 11, 2023

जळगाव पुन्हा हादरले ! डोक्यात कुऱ्हाड मारून तरुणाची हत्या

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२३ । जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली आहे. मागील काही दिवसात खुणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत असून आरोपींना कायद्याचा धाकच राहिलेला नसल्याचे दिसून येतेय. दरम्यान, जळगावात आणखी एका खुनाची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या गिरणा नदीपात्रामध्ये अज्ञात इसमानी डोक्यात कुऱ्हाड मारून तरुणाची हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली आहे. आशिष उर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (वय २२, रा. शनिपेठ, बांभोरी ता. धरणगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकऱ्यांचा अद्यापही पत्ता लागला नसून मात्र या हत्येमुळे बांभोरी गाव हादरला आहे.

धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथे राहणार आशिष शिरसाळे हा आपल्या आई-वडील व मोठ्या भावासह वास्तव्यास आहे. दोघेही भाऊ गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान, आशिषहा शुक्रवारी २३ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तो गिरणा नदीपात्रामध्ये शौचास गेला होता. तेथे अंधारामध्ये कोणीतरी अज्ञात इसमांनी त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून त्याची हत्या केली.

बराच वेळ झाला आकाश घरी आला नाही म्हणून त्याची शोधाशोध झाल्यानंतर काही वेळाने गिरणा नदी पात्रात तो रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मयत तरुणाची हत्या कोणी व कोणत्या कारणासाठी केली याबाबत धरणगाव पोलिसांसह एलसीबीचे पथक कामाला लागले आहेत. मात्र हा खून वाळूच्या वादातून झाल्याचा बोललं जात आहे. घटनास्थळी काही अंतरावर पोलिसांना त्याचा तुटलेला मोबाईल सापडला आहे. दरम्यान या हत्येमुळे बांभोरी गाव हादरला असून तरुणाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.