⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

कौतुकास्पद! चोपडा आगारात प्रथमच एसटी बसचे स्टेरिंग महिलेच्या हाती

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० सप्टेंबर २०२३ । आजच्या युगात महिला कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नसून सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात. आता पुन्हा एकदा एका महिलेच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. चोपडा एसटी महामंडळाच्या बस आगारा इतिहासात पहिल्यांदाच एसटी बसचे स्टेरिंग महिलेच्या हाती देण्यात आलं. संगीता भालेराव, असे महिला चालकाचे नाव आहे. त्यांनी चोपडा ते खेडीभोकरी बस फेरीवर कामकाज करून बस चालवली आहे.

चोपडा तालुक्यातील अंबाडे येथील रहिवासी संगीता भालेराव ह्या नवीनच प्रशिक्षण घेऊन चोपडा आगाराला नियुक्त झालेल्या आहेत. नियुक्त झाल्यावर त्यांनी प्रथमच खेडीभोकरी ड्युटी केली. अत्यंत सामान्य कुटुंबातील संगीता भालेराव यांनी यांनी जेमतेम शिक्षण पूर्ण करून बसचे स्टेरिंग हातात धरले. चोपडा आगार प्रमुख महेंद्र पाटील आणि गोरगावले येथील महिला प्रवाशांसह सर्वांनी संगीता भालेराव यांचे स्वागत केले.

एक महिला बस चालवत आहे हे पाहून बस मधील प्रवाश्यानी आश्चर्य वाटले होते. खेडीभोकरी बस मधील खास करून महिला भगिनींनी त्याचे कौतुक केले तर गोरगावले येथील सरपंच सुरेखा कोळी यांनी देखील महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत,संगीता भालेराव ह्या विशेष म्हणजे आमच्याच तालुक्यातील रहिवासी असल्याने आम्हाला विशेष आनंद आहे असे त्याचा सत्कार करतांना बोलून दाखवले.