बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

रेल्वे ट्रॅकवरील आत्महत्या रोखण्यासाठी १८ किमीची ‘ग्रेट वॉल ऑफ रेल्वे’

जळगाव लाईव्ह न्यूज | २० सप्टेंबर २०२३ | जळगाव रेल्वे स्थानक परिसरासह मध्य व पश्चिम लोहमार्गावर रेल्वेखाली आत्महत्या करण्याच्या घटना अलीकडच्या काही महिन्यांमध्ये वाढल्या आहेत. तसेच रुळ ओलांडतांनाही अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे तर्फे जनगागृती करण्यात येते. कधी कधी धोकादायक पध्दतीने रुळ ओलांडणाऱ्यांना कायद्याचा दणकाही दिला जातो. आता रेल्वे ट्रॅकवरील मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी भुसावळ डीआरएम विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.

जळगाव तहसील कार्यालयाकडून तसेच शिवाजीनगरच्या नवीन बांधलेल्या पुलाखालून अनेक जण रेल्वे रूळ ओलांडत असल्यामुळे होणाऱ्या अपघात व रेल्वेखाली आत्महत्या करण्याचे प्रमाण येथे वाढले आहे. या जागेची पाहणी डीआरएम ईती पांडे यांनी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना संरक्षक भिंत लवकरात लवकर बांधून हा रस्ता बंद करण्याच्या सूचना दिल्या. रेल्वे लाइनलगत १८ किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत बांधण्याचे काम लवकरच सुरू केले जाणार आहे.

रेल्वे खाली आत्महत्या करणे व रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांबाबत तसेच स्वच्छता पंधरवडा अभियान अंतर्गत भुसावळ विभागाकडून जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अतंर्गत मध्य रेल्वे भुसावळ विभागातर्फे जळगाव शहरात सोमवारी सकाळी जिल्हा परिषदसमोरील उड्डाणपुलाखाली तसेच सुरत गेट येथे रेल्वे पोलिस पथनाट्य पथकाद्वारे जनजागृती करण्यात आली. यावेळी डीआरएम ईती पांडे यांनी रेल्वे लाइनची पाहणी करून १८ किलोमीटरची संरक्षक भिंत बांधण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.