⁠ 
शनिवार, मे 4, 2024

दिव्यांगांना मिळणार वैश्‍विक ओळखपत्र; ऑनलाईन अर्ज करण्यासाठी समाज कल्याण विभागाने केले आवाहन

जळगाव लाईव्ह न्यूज| २१ ऑगस्ट २०२३। दिव्यांगांसाठी वैश्‍विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसीत करण्यात आली आहे. दिव्यांग वैश्‍विक ओळखपत्र प्राप्त करून घेण्यासाठी केंद्र शासनाच्या www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपली वैयक्तिक माहिती पूर्ण भरून ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी केले आहे.

दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ अन्वये दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरणाच्या अनुषंगाने देशात २ ऑक्टोबर २०१८ पासून महाराष्ट्र राज्यात सदर प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सर्व शासकीय जिल्हा रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, तसेच विनिर्दिष्ट केलेले महापालिकेचे वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये यांच्यामार्फत वितरण प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे.

दिव्यांगांना वैश्‍विक ओळखपत्र (युडीआयडी) प्राप्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरता येतो. अर्ज भरल्यानंतर दिव्यांग व्यक्तीस त्यांच्या अर्ज भरल्याची पावती प्राप्त होते. सदर रिसीप्टवर त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयांची यादी दिसेल. अर्जदार यांना त्यांच्या दिव्यांगत्व प्रकारानुसार घराजवळील रुग्णालयात तपासणीसाठी जाता येईल. सदर ऑनलाईन अर्ज संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक/अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध झाल्यावर ऑनलाईन अर्जाची पडताळणी करतात.

पडताळणी केलेला ऑनलाईन अर्ज संबंधित दिव्यांगत्वाचे मुल्यांकन करणाऱ्या तज्ज्ञांकडे पाठविला जातो. संबंधित तज्ज्ञ त्या दिव्यांग लाभार्थ्याची मुल्यांकन करुन केलेले मुल्यांकन ऑनलाईन संकेतस्थळावर अद्यावत करतो. ऑनलाईन अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग होतो. दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश ऑनलाईन संकेतस्थळावर अद्यावत केल्यानंतर लाभार्थ्याला वैश्‍विक ओळखपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होते.

जिल्हा शल्य चिकित्सक/ अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचे कार्यालयाकडून ऑनलाईन जनरेट केलेल्या वैश्‍विक ओळखपत्र महाराष्ट्र राज्यासाठी नेमलेल्या प्रिंटिंग एजन्सीकडे ऑनलाईन हस्तांतरीत केले जाते. प्रिंटिंग एजन्सीद्वारे वैश्‍विक ओळखपत्रे संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांना स्पीड पोस्टद्वारे घरपोच प्राप्त होतात.