जळगावात नियम मोडणाऱ्या 10 बसेसवर दंडात्मक ; ठोकला ‘एवढा’ दंड
जळगाव लाईव्ह न्यूज । ९ नोव्हेंबर २०२३ । देशातील सर्वात मोठा दिवाळी सण साजरा करण्यासाठी अनेक कुटुंब परिवारासह गावी जातात. यादरम्यान, खासगी बस मालक, चालक मोठ्या प्रमाणात भाडेवाढ करण्यासह अतिरिक्त प्रवासी बसवून वाहतूक करीत असतात. तसेच याच काळात या बसेसमधून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होते. अशातच जळगावात नियम मोडणाऱ्या १० बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांना एक लाख दंड करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी तपासणी मोहीम हाती घेतली असून अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने वायुवेग पथक, दोन महसूल सुरक्षा पथक, विशेष तपासणी पथक यांच्यावतीने संयुक्त तपासणी राबविण्यात येऊन आकाशवाणी चौकात पुणे, मुंबई, सुरत येथून आलेल्या २२ बसेचची तपासणी करण्यात आली.
यामध्ये दोषी आढळलेल्या १० बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या बसेसमध्ये अतिरिक्त प्रवासी आढळून येण्यासह मालाची वाहतूक केली जात होती. या सोबतच बसेसच्या कागदपत्रांचीदेखील तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान जादा भाडे आकारणी आढळून आली नसल्याचे सांगण्यात आले.