जळगाव दरोडा प्रकरणातील एक संशयिताला पुण्यातून अटक
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२४ । जळगाव शहरातील सराफ बाजारातील सौरभ ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकून ३२ लाखांचा ऐवज लुटला नेल्याची घटना दोन दिवसापूर्वी पहाटे घडली होती. या घटनेला २४ तास उलटत नाही तोच पोलिसांनी एका दरोडेखोराला पुण्यातून ताब्यात घेतले आहे. त्यासोबत आणखी दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
दरम्यान, दरोडा टाकणारे गुन्हेगार दृष्टिक्षेपात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सोमवारी पहाटे साडेतीन ते सव्वाचार वाजेदरम्यान भवानी माता मंदिरासमोरील सौरभ ज्वेलर्स या सुवर्णपट्टीवर दरोडा पडला. या दरोडेखोरांच्या शोधार्थ पोलिसांचे सहा पथक वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत. त्यातील एलसीबी व शनिपेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाला एका दरोडेखोराचे लोकेशन नगर महामार्गावरून पुण्याकडे जात असल्याचे सापडले, त्यावरून पोलिसांनी त्याचा माग घेत त्याला पुण्यात मंगळवारी पहाटे ताब्यात घेऊन दुपारी जळगावात आणले
पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलेल्या संशयिताशी संबंधित दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, त्यांचा या घटनेशी संबंध आहे किंवा नाही याचा शोध पोलिस घेताहेत. दरम्यान, सौरभ ज्वेलर्सने सोन्याचा विमा काढलेला आहे. हा विमा २५ लाखांचा असल्याचे सांगण्यात येते.
पोलिसांनी या दरोडयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, ज्या संशयिताला पुष्यात ताब्यात घेतले त्याच्याकडून दरोड्यात कोणकोण सहभागी होते याची माहिती मिळाली आहे. त्याचा शोध घेण्यासाठी नव्याने पथक रवाना करण्यात आले आहे. ते लवकरच संशयितांना ताब्यात घेतील असे पोलिसांनी सांगितले.