जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । मित्रांसोबत पोहोण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय शाळकरी बालकाचा खदानीच्या गाळात अडकून पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार केली होती. काल शनिवारी दुपारी ३ वाजता मृतदेह सापडला असून या घटनेमुळे कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दरम्यान, कुटुंबीयांची तक्रार नसल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुमीत योगेश न्हावी (वय १४, रा. कुसुंबा, ता. जळगाव) असे मृत मुलाचे नाव आहे. सुमितचे वडील तालुक्यातील शेंदुर्णी येथे राहतात. तो शिक्षण घेण्यासाठी कुसुंबा येथे मामाकडे राहत होता. शुक्रवारी दुपारी सुमीत काही मित्रांसोबत उजाड कुसुंबा भागात एका खदानीत पोहोण्यासाठी गेला होता. यावेळी गाळात अडकल्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही घटना पाहून त्याच्यासोबत असलेले मित्र भांबावले. ते सर्व घरी निघून आले व त्यांनी गावात ही घटना कुणीही सांगितली नाही. परिणामी सुमितचे कुटुंबीय रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध घेत राहिले. याप्रकरणी त्याचे मामा अशोक सुभाष सोनवणे यांनी शनिवारी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरवल्याबाबत तक्रार दिली.
त्यानुसार अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. दुपारी ३ वाजेच्या सुमारास काही डापकर यांनी लोकांना खदानीजवळ सुमीतचे कपडे आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर सुमीत पाण्यात हरवला. बुडाला असल्याची माहिती समोर आली. पोलिस पाटील राधेश्याम चौधरी व मामा अशोक सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्यात शोध घेतला असता सुमीतचा मृतदेह आढळून आला. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी काही घातपात आहे का? याची चौकशी करुन पाहणी केली. गफूर तडवी व सिध्देश्वर घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला.
अकस्मात मृत्यूची नोंद
या संदर्भात कुटुंबीयांची तक्रार नसल्यामुळे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत सुमित हा कुसुंबा गावात आई व लहान भाऊ राज यांच्या सोबत राहत होता. त्याची आई चटई कंपनीत कामाला जाते.