जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्हा कारागृहात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. न्यायालयाने जामीन नामंजूर केले म्हणून २६ वर्षीय बंदीवानाने जिल्हा कारागृहात बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. बंदीवानावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्याच्याविरूद्ध गुरूवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी काय आहे घटना?
चेतन पितांबर सोनार हा २४ ऑगस्ट २०२० पासून जिल्हा कारागृह येथे भादंवि ३५४, ३७६, पोस्को अंतर्गत न्यायालयाच्या आदेशाने बंदी आहे. गुरूवारी सकाळी १० ते १०.३० वाजेच्या सुमारास त्याने कारागृहातील बॅरेक भिंतीवरील खिळा गिळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार कारागृह शिपाई अरविंद म्हस्के यांच्या लक्षात आला. त्यांनी लागलीच ही बाब तुरूंग अधिकारी संतोष पवार यांना कळविली.
पवार यांनी बंदी चेतन सोनार याची विचारपूस केल्यावर त्याने न्यायालयाने जामीन नामंजूर केला म्हणून खिळा गिळून घेतल्याचे सांगितले. पवार यांनी लागलीच रूग्णवाहिका बोलवून बंदीवानाला जिल्हा कारागृहात उपचारार्थ नेले. एक्स-रे रिपोर्ट काढल्यावर बंदीवानाने खिळा गिळल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तुरूंग अधिकारी संतोष पवार यांच्या फिर्यादीवरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी चेतन सोनार याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.