पिंप्राळ्यात भरदिवसा घर फोडले, मोबाईल, लॅपटॉपसह हजारोंचा ऐवज चोरी

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ नोव्हेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यातील चोरीची मालिका सुरूच असून दररोज कुठे ना कुठे घरफोडी केल्याचे समोर येत आहे. पिंप्राळा परिसरात असलेले बंद घर चोरट्यांनी भर दिवसा फोडल्याची घटना समोर आली असून चोरट्यांनी हजारोंचा मुद्देमाल चोरून नेला आहे.

पिंप्राळा परिसरातील सोनी नगरात हेमंत प्रदीप सूर्यवंशी हे कुटुंबासह राहतात. खाजगी नोकरी करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात. दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ते दि.१ नोव्हेंबर रोजी कुटुंबासह नांदेड, माहूरगड येथे गेले होते. गावी जातांना त्यांनी शेजाऱ्यांना घरी लक्ष देण्याचे सांगितले होते. सोमवार दि.७ रोजी दुपारी ते घरी परतले असता त्यांना सर्व दरवाजाचे कुलूप आणि कडीकोंडा कापलेला दिसून आला.

चोरट्यांनी घरी कुणीही नसल्याची संधी साधत घराचे कडी कोंडे तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाट आणि देव्हाऱ्यातील २१ हजारांचे सोने-चांदीचे दागिने, ३० हजार रुपये रोख, १ मोबाईल, १ लॅपटॉप असा मुद्देमाल चोरून नेला आहे. हेमंत सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास संजय सपकाळे करीत आहेत.

दरम्यान, सोमवारी दुपारी १ वाजेपर्यंत घराचे कडीकोंडे शाबूत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी हेमंत सूर्यवंशी यांना दिली आहे. दिवाळीच्या सुट्टीची संधी साधत चोरटे चांगलेच सक्रिय झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.