सुकळीनजीक अपघातात चारवर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू

जळगाव लाईव्ह न्युज | सुभाष धाडे | जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली येथुन मुक्ताईनगर तालुक्यातील इच्छापुर-निमखेडी येथे नातेवाईकांकडे लग्नसमारंभासाठी जायला निघालेल्या दुचाकीस मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळी येथे पाठीमागुन येणाऱ्या मालट्रकचा कट लागून झालेल्या अपघातात चार वर्षीय बालिकेचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना १४ रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत उपलब्ध माहितीनुसार, नातेवाईकांकडे लग्नसमारंभासाठी जामनेर तालुक्यातील मौजे मांडवे बु. येथुन मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे इच्छापुर येथे निघालेल्या दुचाकीस (क्र. एम एच १९ डि झेड ९५५४) सुकळीजवळ पाठीमागून आलेला ट्रकने (क्रं आर जे जी ए ८५०८) कट मारल्याने घडलेल्या अपघातात कु.वेदिका अमोल तायडे (वय-४ रा.नांद्रा हवेली,ता-जामनेर) हि मुलगी ट्रकच्या मागील चाकात येऊन गंभीररीत्या जखमी होऊन जागीच ठार झाली.तसेच विजय भरत विसावे (रा.मांडवे,ता-जामनेर) हा युवक गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी दिडच्या सुमारास घडली.

याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला विजयची आई मीराबाई भरत विसावे (वय-३५,रा.मांडवे बु) यांच्या फिर्यादीवरून ट्रकचालक गिरधारी लाल मेघवाल (राजस्थान) यांच्यावर भां.द.वि कलम ३०४अ,२७९,३३७,३३८,४२७,१८४ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे करीत आहेत.

गावाजवळ घडलेल्या ह़्रद्यद्रावक घटनेने समाजमन सुन्न झाले असुन हळहळ व्यक्त होत आहे.घटनास्थळी मोठा जमाव जमला होता.पोउपनिरीक्षक राहुल बोरकर यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन जखमींना उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले.
गावातर्गत रस्त्याच्या कडेने असलेले अतिक्रमणही देत आहे

अपघाताला आमंत्रण

दोन राज्यांना जोडणारा मलकापुर-बऱ्हाणपुर राज्यमार्गावर गावठाण परिसरात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण वाढले असुन साईडपट्ट्यांवर झालेली अतिक्रमणे, उकिरडे,केर-कचरा टाकला जात असल्याने रस्त्याची सुरक्षित रुंदीत बाधा निर्माण झाली असुन अपघातांना आमंत्रण मिळत आहे.याशिवाय पादचाऱ्यांसह शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.याबाबत शाळा प्रशासनाकडुन वारंवार तक्रारी करुनसुद्धा सा.बा.विभाग सर्रासपणे दुर्लक्ष करीत असल्याची वस्तुस्थिती आहे.