जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना रक्ताने लिहिले निवेदन; हे आहे कारण

ऑक्टोबर 6, 2023 11:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ ऑक्टोबर २०२३ | जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील रहिवासी असलेल्या शेतकरी पुत्राने मुख्यमंत्र्यांना रक्ताने निवेदन लिहिले आहे. उर्वेश साळुंखे असे त्याचे नाव असून हे रक्ताने लिहलेले निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे. हे निवेदन देण्यासाठी आठ ते दहा दिवसापासून मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत होता मात्र वेळ मिळत नसल्याचे त्याने सांगितले.

padlse jpg webp

पाडळसरे धरण पूर्ण व्हावे यासाठी त्याने हे पत्र लिहीले आहे. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून पाडळसरे धरणाचे काम अपूर्ण आहे. हे धरण राज्य सरकारने व केंद्र सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावे. यासाठी उर्वेशने आपले स्वतःचे रक्त काढून त्या रक्ताने निवेदन तयार केले. यामुळे येत्या २० ते २५ दिवसात उर्वेशला मुख्यमंत्र्यांनी वेळ न दिल्यास २६ व्या दिवशी उर्वेश साळुंखे मंत्रालयात उडी घेणार असे तो म्हणाला. उडी घेतल्यांनतर जीविताचे काही बरेवाईट झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील असेही तो म्हणाला

Advertisements

जळगाव व धुळे जिल्ह्यास वरदान ठरणारा निम्न तापी पाडळसे प्रकल्प खान्देशातील मोठा सिंचन प्रकल्प आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रेंगाळला आहे. पाडळसे प्रकल्प पूर्ण झाला असता तर जिल्ह्याच्या सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली असती. हा प्रकल्प अपूर्ण असल्याने दरवर्षी लाखों लिटर पावसाचे पाणी वाहून जाते. राजकीय व प्रशासकीय पातळीवरील उदासिनतेमुळे हा प्रकल्प गेल्या २५-२६ वर्षांपासून अपूर्ण स्थितीत आहे.

Advertisements

धरणासाठी केंद्राकडून भरघोस निधी आणण्याचे आश्वासन भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र, त्यातही बळीराजा सिंचन योजना व पंतप्रधान सिंचन योजनेतही धरणाचा समावेश होत नसल्याने हे धरण पूर्ण होण्याची आशा फोल ठरली. आताही दररोज नवनवी आश्‍वासने दिली जात असली तरी प्रकल्पाचे काम रखडलेलेच आहे! अमळनेर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत पाडळसे प्रकल्पाचा मुद्दा राजकीय अजेंड्यावर असतो.

पाडळसे प्रकल्पाची तांत्रिक माहिती
अमळनेर तालुक्यात मौजे पाडळसे गावाजवळ तापी नदीवर हा प्रकल्प होत आहे. एप्रिल १९९९ पासून या प्रकल्पाच्या कामास सुरुवात झाली असून प्रकल्पाचे ४३ टक्के काम पूर्ण झाले आहे. ११२७.७४ कोटींची सुप्रमा प्राप्त असून २७५१ कोटीची चतुर्थ सुप्रमा मान्यतेची कार्यवाही सुरू आहे. प्रकल्पावर आतापर्यंत ५४१.७३ कोटी रुपये खर्च झाला असून अजून २२०९.३२ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. निम्न तापी प्रकल्पाची टप्पा १ ची प्रकल्पीय सिंचन क्षमता २३३२८ हे. असून प्रकल्पीय पाणीसाठा २६२.५८ दलघमी आहे. प्रकल्पाचे उजव्या तीरावरील माती धरणाचे काम पूर्ण झाले असून डाव्या तीरावरील माती धरणाचे काम ७० टक्के झाले आहे. तर धरणाचे बांधकाम सांडवा मुर्धा पातळी १३९.२४ मी.पर्यंत झाले आहे. प्रकल्पाचे स्थापत्य कामे, वक्राकार दरवाजे, उर्वरित भूसंपादन व पुनर्वसन कामे वेळेत (जून २०२६) पूर्ण होण्यासाठी दरवर्षी ३५० ते ४०० कोटींची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now