⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

भरधाव आयशरची दुचाकीला धडक ; शेतकरी ठार

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२३ । जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच भरधाव आयशरने दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी ठार झाला. सोपान विठ्ठल साबळे (वय-४४) असे मयताचे नाव असणं ही घटना जळगाव तालुक्यातील विटनेर इथे घडली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी कशी घडली घटना?

याबाबत अधिक असे की, विटनेर येथे पत्नी व मुलांसह वास्तव्याला असलेले सोपान साबळे हे बुधवारी २२ फेब्रुवारी रोजी ते शेतात दुचाकीने गेले होते. दरम्यान, दुपारी २ वाजेच्या सुमारास शेतातून जळके गावात कामानिमित्त दुचाकीने निघाले. दरम्यान जळके ते विटनेर रस्त्यावरील ज्ञानेश्वर पाटील यांच्या शेताजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या आयशरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात सोपान साबळे यांचा मृत्यू झाला. परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना करण्यात आला. याबाबत बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात आयशर ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी वंदना, मुलगा किरण, आश्विनी आणि सोनाली या दोन मुली असा परिवार आहे.