पुत्राच्या लग्न सोहळ्यात शेतकऱ्याने वाहनावर ठेवली बैलगाडी
जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । उभ्या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा आजही ताठ मानेने जीवन जगत आहे. यामुळे शेती व्यवसाय वरिष्ठ आणि नोकरी कनिष्ठ दाखवत आहे. शेतकरी पुत्राच्या लग्न सोहळ्यात सजविलेल्या गाडीवर बैलगाडीचे चिन्ह ठेवत शेतकऱ्याने सर्वाना आकर्षित केले.
कळमसरे ता.अमळनेर येथील आदर्श शेतकरी योगेंद्रसिंग राजपूत यांच्या मुलाच्या विवाहाप्रसंगी चक्क नवरदेवाच्या गाडीलाच शेतकरी राजाच्या रथाचे प्रतीक असलेले बैलगाडीचे चिन्ह व “शेतकरी” बैनर लावले होते.
योगेंद्रसिंग रामसिंग राजपूत यांचा एकुलता एक मुलगा भुपेंद्रसिंग राजपूत शिक्षित तरुण हा वडिलांच्या शेती व्यवसाय जोपासत आहे. शिरपुर येथील जगदीशसिंग देशमुख यांच्या कन्या हेमांगीदेवी हिच्याशी विवाह झाला. सद्यस्थितित विवाह होताना नवरदेवाच्या गाडीला वेगवेगळे फिल्मी बैनर पाहायला मिळतात. अथवा नवरदेव– नवरी मुलीचे नावे किंवा वेगवेगळ्या सजावटी दिसतात. मात्र आजच्या तरुणाईला यातून वेगळा संदेश मिळाल्याने नवरदेवासाठी सजवलेल्या गाडीवर “बैल गाडीचे” चिन्ह सर्वाना आकर्षण ठरले होते.