जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच ; दाम्पत्याचे घर फोडून दागिन्यांसह रोकड लांबविली
जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२४ । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. अशातच मुलीला भेटण्यासाठी ऑस्ट्रेलीया येथे गेलेल्या दाम्पत्याच्या पिंप्राळ्यातील घरात चोरट्यांनी डल्ला मारून सोने, चांदीच्या दागिन्यांसह ६० हजारांचा ऐवज लांबवला. रामानंद पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.
छगनलाल शांतीलाल सव्वालाखे- जैन हे पत्नी सुरेखा यांच्यासह पिंप्राळातील विद्यानगरात वास्तव्यास राहतात. त्यांची मुलगी श्वेता हनमत्ते या ऑस्ट्रेलियाला राहतात. १ मे पासून सव्वालाखे दांपत्य श्वेता यांना भेटण्यासाठी ऑस्ट्रेलियाला गेलेले आहेत. घरी कोणी नसल्याने त्यांच्या शेजारी राहणारी महिला दररोज झाडांना पाणी टाकण्यासाठी येते.
१३ जुलै रोजी ही महिला पाणी टाकण्यासाठी आली त्यावेळी सव्वालाखे यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप, कडीकोयंडा तुटलेला दिसला. त्यावेळी महिलेने सव्वालाखे यांना फोन करून याविषयी माहिती दिली. त्यांनी लहान मुलगी सपना जैन यांना कळविले. त्यांनी जळगावात येऊन घरात पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच घरातील रोख १३ हजार ५०० रुपये, पाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन ग्रॅमची सोन्याची नथ, एक ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन ग्रॅमचे सोन्याचे महालक्ष्मीचे नाणे, ३० ग्रॅमचे चांदीचे नाणे, २० ग्रॅमचे चांदीचे जोडवे, ५० ग्रॅमचे नागदेवता, अनंत, सूर्यदेवता असा एकूण ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
या विषयी सपना जैन यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बीएनएस ३०५, ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशील चौधरी करीत आहेत.