⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

बंद घर फोडून केला सोने चांदीचा ऐवज लंपास

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| ३ ऑगस्ट २०२३। भुसावळ तालुक्यातील निंभोरा गावातील बंद घर फोडून सोन्याचा हार आणि चांदीचा ग्लास असा एकुण २६ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी बुधवारी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, लक्ष्मण पंडीत बोरोले (वय-६५) रा. बोरोले नगर, निंभोरा ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १ ऑगस्ट रोजी लक्ष्मण बोरेलो हे कामाच्या निमित्ताने घर बंद करून बाहेरगावी गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोयंडा कापून आत प्रवेश केला. त्यांच्या घरात गोदरेज कपाटातून चोरट्याने चार तोळ्याचा सोन्याचा हार आणि चांदीचा ग्लास असा एकुण २६ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

बुधवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता घरी आल्यावर घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रेमचंद सपकाळे करीत आहे.