जळगाव लाईव्ह न्यूज । हल्लीच्या काळात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून अशातच जळगावच्या एका व्यापाऱ्याला परप्रांतीयाने लाखो रुपयाचा चुना लावल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलन पेठमधून हार्डवेअर साहित्याची खरेदी करून मालाची पूर्ण रक्कम न देता मनोज विष्णू रडे यांची कर्नाटकातील लक्ष्मण शिवाप्पा असंगी या व्यापाऱ्याने पाच लाख ५६ हजार रुपयांमध्ये फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनोज रडे यांचे पोलन पेठमध्ये प्रभात हार्डवेअर अँड इलेक्ट्रिकल जनरल प्रा. लि. नावाचे दुकान आहे. जानेवारी २०२३मध्ये लक्ष्मण असंगी नामक व्यक्ती आला व त्याने कर्नाटकातील बागलकोट येथे रामदास सिस्टीम इरिगेशन नावाचे दुकान असल्याचे सांगत रडे यांना सहा लाख ९५ हजार २५१ रुपये किमतीच्या मालाची ऑर्डर दिली. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी रडे यांनी माल कर्नाटकात पाठविला.
असंगीकडे पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने काही रक्कम दिली. नंतर पाच लाख ५६ हजार रुपयांचा धनादेश पाठविला. मात्र, तो एररमुळे वटला नाही. पैशांचा तगादा वाढल्यानंतर समोरील व्यापाऱ्याने मोबाइल बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रडे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून लक्ष्मण शिवाप्पा असंगी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.