जळगाव लाईव्ह न्यूज । १ मे २०२२ । पारोळा शहरातील एका मेडिकल चालकाने विवाहितेचा मोबाइल नंबर मागितला म्हणून त्याच्यावर विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून महिला व तिच्या नातेवाइकांनी तरुणाकडे ५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, एका पंचवीस वर्षीय विवाहित महिलेने पारोळा पोलिसांत फिर्याद दिली की, उंदिरखेडा रस्त्यावरील एका किराणा दुकानावर २८ रोजी किराणा घेण्यासाठी त्या गेल्या असता महेश धोंडू साळुंखे (रा. पारोळा) याने पाठलाग करून त्यांच्याकडे मोबाइल नंबरची मागणी केली तसेच लज्जास्पद कृत्य केले. याबाबत महिला व त्यांच्या नातेवाइकांनी जाब विचारला असता त्यांना शिवीगाळ करून दमदाटी करण्यात अाली. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर महेश साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे की, उंदिरखेडा मार्गालगत एका दुकानावर सुपारीची पुडी खरेदी करून पैसे फोन पे केले व मेडिकलवर आलो. या वेळी गणेश छगन मरसाळे, समाधान वसंत मरसाळे, बापू मरसाळे, माधुरी समाधान मरसाळे यांनी माझ्या दुकानावर येवून मोबाइल नंबर का मागितला. या कारणावरून त्यांनी मला गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी महेश साळुंखेच्या फिर्यादीवरून पाराेळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास डीवायएसपी राकेश जाधव करत आहेत.