जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जुलै २०२२ । एरंडोल येथे मारवाडी गल्ली या दोन्ही मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूला ओटे, पायऱ्या व इतर रस्त्यावर असलेली इत्यादी अतिक्रमणे वाढल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहतुकीची दिवसभरात अनेक वेळा कोंडी होते. त्यातून काही अपघात सुद्धा होतात. तसेच कोंडी होते. त्यावेळेस वाहन चालकांचे एकमेकांशी वाद व भांडणे होतात. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच पादचाऱ्यांना चालायला जागा राहत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये मेन रोडला दोन्ही बाजूने निरनिराळ्या स्वरूपाची पक्के अतिक्रमणे झाल्यामुळे रस्ता खूपच अरुंद झाला आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन हाकावे लागते. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी विकास नवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवार पासून बुधवार दरवाजाकडून अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे
. पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. अतिक्रमणांचे हे वाढते संकट दूर करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने “तिसरा डोळा’ उघडला आहे. या नियोजित मोहिमेचे नागरिकांकडून उस्फूर्त स्वागत केले जात आहे. एरंडोल येथे बुधवार दरवाजापासून वि.का. सोसायटी पर्यंत तसेच मारवाडी गल्लीत भगव्या चौकापासून विठ्ठल मंदिरापर्यंत एकूण ३०० नागरिकांना एरंडोल नगरपालिकेने अतिक्रमणे काढण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. ओटे पायऱ्या व रस्त्यावर असलेले बांधकाम अशा स्वरूपाचे अतिक्रमणे काढण्याबाबत नोटिसीत सूचना करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या या कठोर पावलामुळे खडबड उडाले आहे . विशेष हे की गेल्या ६०ते ७० वर्षात शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला त्यामुळे मेन रोडवर व मारवाडी गल्लीतील रस्त्यावर प्रचंड ताण पडला. मारवाडी गल्लीत राष्ट्रीयकृत बँकांसह ६ते ७ बँका आहेत. त्यामुळे बँकेच्या कामाकरिता मारवाडी गल्लीत नागरिकांची मोठी गर्दी होते. तशात अतिक्रमणामुळे या रस्त्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, अभियंता देवेंद्र शिंदे कार्यालयीन अधीक्षक हितेश जोगी, विनोद पाटील अनिल महाजन ,सौरव बागड, डॉ. अजित भट ,एस आर ठाकूर यांचे पथक अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबविणार आहे. नगरपालिकेच्या या धाडसी व जनहिताच्या मोहिमेचे जाणकार नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास धन्यवाद दिले आहे.