जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जून २०२४ । चोपडा शहरात गेल्या १५ दिवसात ५०० रुपयांच्या नकली नोटा आढळून येण्याची घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमधून चिंता व्यक्त होत आहे. बनावटी चलनी नोटा बाजारात कुठून व कश्या येत आहेत याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
अॅक्सिस बँकेच्या डिपॉझिट मशिनमध्ये १८ मे रोजी ५०० रुपयांच्या पाच नकली चलनी नोटा आढळल्याने गोकुळ सुखदेव सोनवणे (रा. चोपडा) यांच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल आहे. तसाच प्रकार ३ जून उघडकीस आला. हर्षल जैन यांचा चार लाखांचा भरणा करण्यासाठी त्यांचा कर्मचारी जाहीद मुश्ताक खान हा अॅक्सिस बँकेत गेला असता त्यातील ५०० रुपयांच्या २२ चलनी नोटा या नकली निघाल्या.
ही बाब बँकेच्या कर्मचाऱ्याने जैन यांना कळवले. शाखा व्यवस्थापक उपेंद्र यादव यांनी सूचना केल्या. त्यानुसार जाहीद मुश्ताक खान (वय १८, रा. दर्गा अली, चोपडा) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कंडारे करत आहे.