जळगाव लाईव्ह न्यूज । १ जून २०२४ । यंदाचा उन्हाचा चांगलाच त्रासदायक ठरत आहे. महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात अद्यापही तापमान वाढीचा कहर पाहायला मिळत असून वाढत्या उष्मघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला. उष्णतेपासून कधी दिलासा मिळेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान यातच हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांना आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी केला. तर उत्तर महाराष्ट्रामध्ये कोरडं हवामान असण्याचा अंदाज आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट :
हवामान खात्याकडून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांना उष्ण आणि दमट हवामानासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना उष्ण लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरम्यान, मान्सून केरळ कर्नाटक तामिळनाडूच्या काही भागात पोहचला आहे. सध्या अरबी समुद्रात जोरदार पश्चिमी वारे वाहत आहेत. यावेळी मान्सूनचा पाऊस विदर्भात बंगालच्या उपसागरातून येण्याची शक्यता आहे.नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आजपासून ६ जुनपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची गडगडाटासह शक्यता आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम जिल्ह्यात ३ आणि ४ जूनला हलक्या पावसाची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामानशास्त्र विभागप्रमुख प्रा. अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
विदर्भामध्ये तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे गेला आहे. शुक्रवारी नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि ब्रह्मपुरी येथे ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर चंद्रपूर येथे ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दिवसासह रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने रात्रीही उष्ण लहरी जाणवत आहेत. दुसरीकडे मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तापमानवाढीचा कल कायम आहे. काही जिल्ह्यात वादळी पावसानंतर उष्णतेच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पुढील दोन दिवस तापमानवाढ कायम राहण्याचा अंदाज असून रात्रीच्या तापमानातही वाढ झालीय.
जळगावातील तापमानात घट :
दरम्यान गेल्या आठवड्यात ४५ अंशावर गेलं होते. यामुळे जिल्ह्यात प्रचंड उष्णता जाणवली. दिवसाचं काय रात्रीही उष्ण झळा जाणवत होत्या. यामुळे जळगावकर उष्णतेमुळे अक्षरश: होरपळून निघाला. मात्र आता यातून काहीसा दिलासा मिळाला. शुक्रवारी जळगावचे तापमान ४०.८ अंशावर आले आहे. तसेच रात्रीच्याही तापमानात घसरण झाली असून रात्री जोरदार वारे वाहत असलयाने वातावरणात गारवा जाणवत आहे. उद्या २ जूननंतर जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.