जळगाव लाईव्ह न्युज : १४ मे २०२४ : सध्या देशासह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. यानंतर आता मान्सूनचा पाऊस कधी येणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहेत. याच दरम्यान, हवामान खात्याकडून एक महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. मान्सूनची वाटचाल वेळेपूर्वी सुरु असून अशीच वाटचाल सुरू राहिल्यास नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) वेळेपूर्वी १९ मे (रविवार) पर्यंत अंदमानात दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे माजी प्रमुख माणिकराव खुळे यांनी दिली.
यामुळे शेतकरी राजाच्या चेहऱ्यावर आनंद झळकणार आहे. मागील वर्षी कमी झाल्यामुळे यंदा वेळेवर येणार मान्सून शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
खरंतर मान्सूनचा पाऊस 21 मे च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते.. सध्या दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर समुद्र सपाटीपासून १ ते १.५ किलोमीटर उंचीवर नैऋत्येकडून येणारे वारे सुरु आहे. हे वारे मान्सून येणार असल्याची सूचना देतात. पुढील दोन दिवसांत अंदमान बेट आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची अधिक प्रगती होणार आहे.
मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल. गेल्यावर्षी राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होता. परंतु, यंदा कोकणात पाऊस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.
यंदा चांगला पाऊस
सध्या अवकाळी पाऊस १९ मे पर्यंत कायम राहणार आहे. १९ मे नंतर अवकाळी पावसाचे वातावरण कमी होणार आहे. यंदा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यंदा पाऊस 106% राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा मे महिन्याचा शेवटी सुधारित अंदाज व्यक्त करणार आहे.