अहो डॉक्टर तुम्हीही! शेअरमध्ये नफाच्या आमिषाने ऑनलाईन ठगांनी लावला 19 लाखाचा चुना..
जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२४ । आताच्या काळात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सुशिक्षित लोकांनाही लाखो रुपयांचा ऑनलाईन चुना लावला जात असल्याचे प्रकार समोर येत आहे. आता अशातच एका डॉक्टरला १९ लाखांत ऑनलाइन गंडवल्याचा प्रकार समोर आला.
रावेर तालुक्यातील निंबोल येथील पंकज विश्वासराव पाटील (वय ४४) हे आयुर्वेदिक डॉक्टर (वैद्य) आहेत. ते समाजमाध्यमावर आलेल्या लिंकवर गेले. त्यावरून ते दोन व्हॉट्सॲप ग्रुपवर जॉइन झाले. त्यावर टास्क देऊन गुंतवणूक करण्यास सांगण्यात आले. जॉइन करून घेतल्यानंतर ग्रुपवरील ‘भामटे सहकारी आपण केलेली गुंतवणूक व त्यावर झालेला नफा याचे स्क्रीन शॉट ग्रुपवर शेअर करत होते. गुंतवणूक करण्यासाठी लिंक पाठवून संबंधित ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
पहिल्यांदा पंकज पाटील यांना पाच हजार रुपये गुंतवल्यावर २० टक्के नफा दाखवला गेला. त्यानंतर १९ डिसेंबर २०२३ ते २ फेब्रुवारी २०२४ या ४५ दिवसांत गुंतवणूक वाढवत जाऊन २० लाख रुपये गुंतवले. त्यापैकी ९६ हजार रुपये परत आले.
त्यानंतर मात्र त्यांना कोणताही नफा न देता मुद्दल रक्कमही परत केली नाही. रक्कम परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने पाटील यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन, त्याचे सहकारी अशा पाच जणांविरुद्ध ३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरीक्षक किंसन नजन पाटील करीत आहेत.