जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी ताईंना मिळाले 4 हजार 96 स्मार्टफोन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । 6 मार्च 2024 । जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या खर्चामध्ये जळगाव जिल्हा परिषदेने मोठी आघाडी घेतली असून निधी खर्चात राज्यात जळगाव जिल्हा प्रथम क्रमांकावर पोहोचला असल्याने शासन दरबारी देखील जळगाव जिल्ह्याचे कौतुक होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी केले.

जळगाव जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात दि.6 मार्च रोजी आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गाव पातळीवर जे शेतकरी मेहनत करून काम करतात व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून शेतीच्या शाश्वत विकासाची कास धरतात अशा शेतकऱ्यांचा आज सत्कार होत आहे ही खऱ्या अर्थाने आनंदाची बाब आहे. शाश्वत शेतीसाठी जलस्रोत आवश्यक असून या कार्यक्रमात पुरस्कार मिळत असलेल्या शेतकऱ्यांनी उपलब्ध जलस्रोतांचा योग्य प्रकारे वापर करून उत्कृष्ट शेती केली असे कौतुक पालकमंत्री गुलबराव पाटील यांनी केले.

गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळण्याची मागणी शासन दरबारी प्रलंबित होती. मात्र खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविकांची ही मागणी या माध्यमातून पूर्ण झाली असल्याने आता अंगणवाडी सेविकांना देखील उत्कृष्टपणे काम करता येणार आहे. अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर यांच्या वेतनात वाढ करण्याचा प्रस्ताव देखील शासनाच्या विचाराधीन असून लवकरात लवकर याबाबतची घोषणा होणार असल्याचे देखील पालकमंत्र्यानी यावेळी सांगितले.

घरकुल योजनेतही जिल्याने उमटवला ठसा
घरकुल महाअवास योजनेत जळगाव जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक व या संबंधित इतर अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील म्हणाले, अधिकारी आणि शासकीय यंत्रणा या विकासाच्या रथाची दोन चाके असून या दोन्ही चाकांनी व्यवस्थितरित्या काम केल्यास जिल्ह्याचा विकासाचा रथ नेहमीच पुढे जात राहील. जिल्ह्यात नियोजन समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून विविध विकास कामे सुरू आहेत. जेथे ज्या बाबीची आवश्यकता आहे अशा मूलभूत सुविधा युक्त बाबी त्या त्या ठिकाणी पुरविल्या जात आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत एकही प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्ण वाहिकेशिवाय राहणार नाही असेही पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांनी यावेळी सांगितले.

दिव्यांग बांधवांना मिळाला वेगवान पाय
या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना सायकलचे वितरण करण्यात आले आहे. ई -सायकलच्या माध्यमातून हाताने सायकल चालवण्याच्या मोठ्या विक्रीच्या समस्येतून दिव्यांग बांधव मुक्त होणार आहेत. उपलब्ध करून देण्यात आलेल्या ही सायकलच्या माध्यमातून या दिव्यांग बांधवांना जणूकाही एक प्रकारे पायाच मिळाले आहेत. आता त्यांचा वेग वाढल्याचे सांगून धरणगाव तालुक्यात 500 दिव्यांग बांधवांना अशा सायकली वाटल्यामुळे त्यांच्यात मोठा आत्मविश्वास आल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. यावेळी सर्वप्रथम पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना व्हीलचेअरचे वाटप, अंगणवाडी सेविकांसाठी प्राप्त झालेल्या स्मार्टफोनचे वाटप, आदर्श शेतकरी पुरस्कारांचे वितरण, तसेच महाआवास योजनेत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित म्हणाले की, अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झालेल्या स्मार्टफोनमुळे अंगणवाड्यांमधील बालके तसेच कुपोषित बालकांबाबतची मूलभूत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. त्यासोबतच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीच्या माध्यमातून विविध विकास कामांवर निधी खर्च करण्यात जळगाव जिल्हा परिषदेने आघाडी घेतली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत विविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यास वाव मिळाला असल्याचेही अंकित यांनी यावेळी सांगितले. महिला व बाल विकास विभागाचे प्रकल्प संचालक देवेंद्र राऊत यांनी मनोगतात सांगितले की केंद्र शासनाच्या पोषण आहार योजनेअंतर्गत 4 हजार 96 स्मार्टफोन जळगाव जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांसाठी उपलब्ध झाले आहेत. या स्मार्टफोनच्या माध्यमातून बालकांची उपस्थिती आहाराचे वाटप तसेच कुपोषणाच्या नोंदी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावता येणार आहे.

घरकुल योजने संदर्भातली माहिती देताना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी सांगितले की अमृत आवास योजना, शबरी आवास योजना, पंतप्रधान आवास योजना, तसेच मोदी आवाज योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुडे मिळवून देण्यासाठी जळगाव जिल्ह्याने मोठी कामगिरी केली असल्यामुळे घरकुलांमध्ये दिलेली उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली आहे. यावेळी उत्कृष्ट शेतकरी म्हणून अनिल राजाराम ताडे शिरसोली तसेच भगवान फकीरचंद पाटील, गाढोदा यांना शाल श्रीफळ पुष्पहार तसेच प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर घरकुल योजनेत उत्कृष्ट काम करणारे गट विकास अधिकारी यावल ग टविकास अधिकारी बोदवड, जामनेर धरणगाव भुसावळ येथील गट विकास अधिकाऱ्यांना देखील गौरविण्यात आले. पंतप्रधान आवास योजनेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मोरगाव तालुका जामनेर देवगाव तालुका पारोळा खेडगाव तालुका एरंडोल हिंगणा बुद्रुक तालुका अमळनेर, कानडा तालुका जळगाव व चिंचोली तालुका यावल येथील सरपंच ग्रामसेवक यांना देखील पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळालेले अनिल ताडे यांच्या पत्नी मनीषा ताडे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात यावेळी मनोगत व्यक्त केले. तर अंगणवाडी सेविकांमधून प्रेमप्रताप पाटील यांनी प्राथमिक स्वरूपात मनोगत व्यक्त करून शासकीय यंत्रणेचे आभार मानले. सूत्रसंचालन विलास बोंडे यांनी तर आभार प्रदर्शन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button