भादलीत विधवा महिलेने घेतला गळफास, दोन्ही मुले झाली अनाथ
जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२४ । भादलीत विधवा महिलेने गळफास घेत आत्महत्या केली असून मात्र ही आत्महत्या नसून तिला सासरच्या मंडळींनी मारल्याचा आरोप माहेरच्यानी केला आहे. मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन नशिराबाद पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यात दोन संशयीतांना अटक करण्यात आली.
भादली येथील जुलेखा गफ्फार पटेल यांच्या पतीचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. दोन मुलांचे संगोपन करत जुलेखा या सासरीच वास्तव्यास होत्या. दरम्यान २ फेब्रुवारीला सकाळी सातच्या सुमारास त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले. सासरच्या मंडळींनी तिच्या माहेरी ही बाब कळविली. मृत महिलेची माहेरची मंडळी शासकीय रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर जुलेखाचा मृतदेह स्वत: रुग्णालयात न आणता तो, रिक्षात पाठवून दिल्याचा माहेरच्या मंडळींनी आरोप केला.
जुलेखा पटेल यांनी आत्महत्या केली नसून सासरच्या मंडळींनी मारल्याचा आरोप मृत जुलेखा यांच्या भावासह नातेवाईकांनी केला. यावरून सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. मृत महिलेचा भाऊ हसीम याकूब पटेल यांनी नशिराबाद पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन सासू अशरफ मुसा पटेल, जेठ कालू ऊर्फ गयासोद्दीन पटेल, हारुण पटेल, ईसा पटेल, जेठाणी मदिना पटेल, मीना पटेल यांच्यासह वसीम सलीम पिंजारी (सर्व रा. भादली) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी जेठ कालू पटेल व इसा पटेल यांना अटक करण्यात आले आहे.