वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ‘या’ मराठी क्रिकेटरचं पुनरागमन..

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२३ । इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी विजेतेपद अर्थात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी (ICC World Test Championship) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात विशेष म्हणजे आयपीएलमध्ये स्फोटक खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला देखील संधी देण्यात आलीय. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर राहणेचं पुनरागमन झाल्याने त्याच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्सशिपसाठी संघाची कमान रोहित शर्माकडे तर केएस भरत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे. केएल राहुल आणि जयदेव उनाडकट यांनीही १५ सदस्यीय संघात आपली जागा कायम राखण्यात यश मिळवले आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 ते 11 जून दरम्यान लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाईल. या मोठ्या सामन्यासाठी १२ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.

संघात 6 अनुभवी फलंदाज आणि 5 वेगवान गोलंदाज
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या 15 सदस्यीय संघात यष्टीरक्षक केएस भरत व्यतिरिक्त 6 प्रमुख फलंदाज असतील. त्याचबरोबर भारताच्या या संघात 5 वेगवान गोलंदाजांना स्थान मिळाले आहे. तर 3 फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात दोन डावखुरे आहेत.

WTC फायनलसाठी 15 खेळाडू, समीकरण काय सांगते?
टीम इंडियाची यादी पाहता, डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये ओपनिंगची जबाबदारी फक्त रोहित शर्मा आणि शुभमन गिलच सांभाळताना दिसतील. अजिंक्य रहाणेचे संघात पुनरागमन म्हणजे तो मधल्या फळीत खेळताना दिसणार आहे. आणि, असे झाल्यास केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल.

शमी आणि सिराज वेगवान गोलंदाजी सांभाळताना दिसणार आहेत. तर फिरकीपटूंच्या भूमिकेत अश्विन आणि जडेजा ही जोडी कर्णधार रोहितची पहिली प्राथमिकता असू शकते. बरं, प्लेइंग इलेव्हनची निवड केव्हा होणार हा मुद्दा आहे. सध्या, आपण त्या 15 खेळाडूंची नावे पाहू शकता ज्यांची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

WTC फायनलसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे?
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट