दोन दिवसात सोने 500 रुपयाने तर चांदी 1000 रुपयांनी महागली; जळगावतील ताजे दर पहा..
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२४ । डिसेंबर २०२३ महिन्यात सोने आणि चांदीच्या किमतीने उच्चांक गाठला होता. मात्र गेल्या महिन्यातील जानेवारीत दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण दिसून आली. या महिन्याच्या सुरूतीला देखील सोने आणि चांदीने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दिलासा होता. सलग दोन आठवड्यात घसरण झाल्याने ६३ हजार रुपयावर असलेला सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६२ हजाराच्या घरात आला होता. तर चांदीचा दर देखील ७२ हजार रुपयावर आला होता. मात्र गेल्या काही दिवसात सोने चांदी दरात मोठी वाढ दिसून आली. Gold Silver Rate 21 February 2024
जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६२,२०० (विनाजीएसटी) रुपयांवर होता. मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने ६२,४०० रुपयांवर आले तर मंगळवारी १०० रुपयाची वाढ होऊन ते ६२,५०० तर आता २०० रुपयाची वाढ झाली असून सोन्याचा दर ६२,७०० रुपयावर जाऊन पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसात सोने ३०० रुपयांनी तर पाच दिवसात सोन्याच्या भावात तब्बल ५०० रुपयाची वाढ दिसून आली. दुसरीकडे आठवड्याभरात चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली.
आठवड्याभरात चांदीच्या दरात तब्बल २५०० हजार रुपयाची वाढ झाली. गेल्या बुधवारी चांदीचा दर विनाजीएसटी ७०,५०० रुपायांवर होता. त्यानंतर चांदीचे दर चार दिवस ७२ हजारांच्या खाली होते. मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी ७२ हजारांचा टप्पा पार करत ७२५०० झाले, तर काल मंगळवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ नोंदवून ते ७३ हजारांवर गेले, ही जी दरवाढ झाली आहे ती आंतरराष्ट्रीय जगतातील नफेखोरांनी केलेली असल्याचे या व्यवसायातील अभ्यासकांचे म्हणणे आहे.