भारत स्वस्थ झाला तर विश्र्वगुरू होता येईल, त्यासाठी लोकसहभाग आवश्यक – डॉ. मोहन भागवत
जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२४ । भारत पूर्वीपासून विकसित जीवन जगत होता. अनेक आव्हानाचा सामना करत अनेक प्रयोग व निष्कर्ष मधून जीवन जगण्याची योग्य पद्धत आम्हाला माहीत झाली होती. परंतु, आक्रमण काळात जग भारताच्या पुढे गेले आणि पारतंत्र्यात गेल्यामुळे आपला विकास खुंटला. त्यामुळे पुन्हा भारताला गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर स्वास्थ्य उत्तम करावे लागेल आणि भारत निरोगी करायचा असेल तर लोक सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी लातूर येथे केले. ते विवेकानंद कॅन्सर अँड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडविय, टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ राजेंद्र बडवे, प्रांत संघचालक अनिल भालेराव, विवेकानंद रुग्णालय व संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल अंधुरकर, विवेकानंद रुग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. अरुणाताई देवधर आणि डॉ. ब्रीज मोहन झवर आदी मान्यवर उपस्थित होते.
विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलचे २०१५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन झाले होते. २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा यांच्या उपस्थितीत हे रुग्णालय केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त आर्थिक सहभागाने Tertiary Care Cancer Centre म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर करण्यात आली. त्याच अनुषंगाने कॅन्सरवरील किमोथेरपी, रेडिओथेरपी व शस्त्रक्रिया या तिन्ही उपचारांसोबत अन्य सुपर स्पेशालिटी विभाग एकाच छताखाली सुरू करून संस्थेने कॅन्सर हॉस्पिटलचा विस्तार केला आहे. या विस्तारित हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा मा. डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते, मा. मनसुख मांडविया (केंद्रीय आरोग्य मंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉ. राजेंद्र बडवे (संचालक, टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल, मुंबई) यांच्या विशेष उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी डॉ मोहन भागवत व केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी पूर्ण प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे लिखित ‘ध्येय साधनेचे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. तर कमलाक्षी तुंगिकर यांनी गीतगायन केले.
टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे म्हणाले, “आताचा काळ “वेस्ट इज बेस्ट” असा नाही, आपणही त्यांच्याईतके सामर्थ्यवान झालो आहोत, पण आपल्या अधिक करण्याची गरज आहे. भारतातील ६७ टक्के कर्करोग केवळ काळजी घेऊन कमी करता येणे शक्य आहे, व्यसन टाळणे आणि स्वच्छता, स्थूलपणा टाळले तरी प्रमाण कमी होईल. ही काळजी घेतली तर भविष्यात भारत हा जगातील एकमेव राहण्यायोग्य देश राहील. आयुर्वेद हा आरोग्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पण त्यासाठी केमिकल ट्रायल करून त्याची जगाला परिणामकारकता दाखवणू देण्याची गरज आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ मनसुख मांडवीय म्हणाले,“जगाला वाटते हेल्थचा मॉडेल कॉमर्स आहे, पण भारताचा हेल्थ मॉडेल सेवा आहे. आपल्या सांस्कृतिक वारश्यामधून आदर्श घेतला तर कित्येक आजार, आव्हाने आपण कमी करू शकतो. तसेच, आपल्या देशातील जीवनशैली लोकभागीदारीतून सुरू होत आली आहे. विश्व बंधुत्वाचा संस्कार आत्मसात करून जगणे जीच आपली ओळख आहे. भारत त्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. कॅन्सर सारख्या आव्हानांना आपण नक्की मात देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अखेरीस अनिल अंधुरिकर यांनी आभार व्यक्त केले. ते म्हणाले, “ज्या हातानी अयोध्येत रामाची पूजा केली ते हात विवेकानंद रुग्णालयाच्या रुग्णांना आशीर्वाद देण्यासाठी इथे आले आहेत अशी आमची भावना आहे”
विवेकानंद रुग्णालय समाजासाठी आरोग्यतीर्थ, त्याच्या ऊर्जेचा समाजाला उपयोग होईल – डॉ. मोहन भागवत
डॉ. मोहन भागवत पुढे म्हणाले, “आपले प्राचीन ज्ञान आणि आधुनिक ज्ञान दोघांपैकी एकाचाच अट्टाहास करणे अयोग्य. तसेच एलोपथि आणि आयुर्वेदची आपली स्वतंत्र वैशिष्ट्य आहेत, निरोगी भारत घडवण्यासाठी दोघांचं योग्य तिथे आवश्यकतेनुसार उपयोग झाला पाहिजे. विवेकानंद रुग्णालय प्रकल्प ज्या चार डॉक्टरांनी सुरू केला आज त्यांची संख्या वाढली. त्यात अनेक तरुण व महिला आहेत. धार्मिक तीर्थ क्षेत्री साधू तपस्या करतात त्याची ऊर्जा तिथे जाणाऱ्या भक्तांना मिळते, त्याचप्रमाणे हे रुग्णालय देखील तीर्थच आहे, त्याची प्रेरणा आणि ऊर्जा सर्वांच्या उपयोगी येईल असे ते म्हणाले.