जळगाव लाईव्ह न्यूज | 31 जानेवारी 2024 | तुरी, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. जळगावातील बाजार समितीमध्ये तुरीचा भाव तब्बल १० हजार १७५ रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. गेल्या दोन वर्षांत तुरीला मिळालेला हा उच्चांकी भाव असल्याचे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे यंदाच्या नवीन हंगामातील गुलाबी हरभऱ्याला तब्बल ८ हजार ४० रुपये क्विंटल इतका भाव मिळाला. भावात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

नवीन तूर बाजारात दाखल होत असताना गेल्या काही दिवसांपासून तुरीला मागणी वाढली आहे. त्यामुळे तुरीच्या दरात चांगलीच वाढ होत आहे.मंगळवारी जळगाव बाजार समितीमध्ये तुरीचे दर १० हजार १७५ रुपये क्विंटलपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी तुरीला हमीभावापेक्षा जास्त म्हणजे ८ हजार रुपये भाव मिळाला होता; मात्र, यंदा भावाने उच्चांक गाठला आहे.

यंदा मान्सून उशिराने दाखल झाल्यामुळे खरिपाची पेरणीदेखील उशिराने झाली होती. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत मिळणारे तुरीचे उत्पादन हे जानेवारी महिन्यात निघत आहे.तुरीला बाजारात चांगली मागणी असल्याने गेल्या तीन महिन्यांत तुरीच्या दरात २५०० रुपयांची वाढ झाली आहे. तुरीला ७ हजार रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. मात्र, बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा मिळत आहे.
बाजार समितीमध्ये तुरीची खरेदी गेल्या दोन महिन्यांपासून केली जात आहे. मात्र, पहिल्यांदाच तुरीचे दर १० हजार रुपयांच्या पार गेले आहेत. यामुळे तूर उत्पादक शेतकरी आनंदित झाले आहेत.तुरीच्या बाजार भावातील हीच तेजी कायम राहिल्यास काही दिवसांत हे भाव ११ हजारांचा टप्पा गाठतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखरेस तूर १२ हजार रुपयांचा भाव गातू शकेल, असा अंदाज बाजार समितीच्या कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
दुसरीकडे हरभऱ्याला देखील चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी आनंदित आहे. बाजार समितीमध्ये हरभऱ्याची खरेदी सुरु असून, दरात १०० रुपयांची वाढ झाली आहे. गुलाबी हरभऱ्याचे दर ८ हजार ४० रुपयावर गेला आहे. तर चाफा हरभऱ्याचे दर ५,९२५ रुपये इतका दर मिळत आहे.
हे आहेत भाववाढीचे कारण?
यंदा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीप पिकांच्या उत्पादनात प्रचंड घट झाली. त्यातच तुरीचे पीक ऐन फुलधारणेच्या अवस्थेत असताना जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे तुरीला मोठा फटका बसला होता. ढगाळ वातावरण अन् अळींच्या प्रकोपामुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले, यामुळे तुरीच्या उत्पादनात राज्यभरातच घट झाली आहे. त्यातच तुरीला मागणी असल्याने भाव वाढले आहेत








