जळगाव लाईव्ह न्यूज : 15 जानेवारी 2024 : भारतीय रेल्वेने कात टाकत सेमीहायस्पीड असलेली वंदे भारत एक्स्प्रेस आणली आहे. देशातील विविध भागात वंदे भारत एक्स्प्रेस धावत असून देशभरात या ट्रेनला चांगला प्रतिसादही मिळत आहे. वंदे भारत रेल्वेची मागणी वाढत असून वेगवान प्रवास आणि आरामदायी सुविधांमुळे रेल्वे प्रवाशांचा पसंतीला उतरली आहे.
दरम्यान, वंदे भारत एक्प्रेसचा विस्तार केला जात नाही. नवीन नवीन मार्गावर ही रेल्वे धावणार आहे. महाराष्ट्रात आणखी सात मार्गावर वंदे भारत एक्प्रेस धावणार आहे. विषेश म्हणजे भुसावळ मार्गे देखील लवकरच वंदे भारत एक्प्रेस धावू शकते.
लवकरच नवीन सात वंदे भारत एक्सप्रेस धावणार असून यात मुंबई अहमदाबाद, मुंबई शेगाव, पुणे शेगाव, पुणे बेळगाव, पुणे बडोदा, पुणे सिंकदराबाद, मुंबई कोल्हापूर या मार्गांचा समावेश आहे. येत्या वर्षभरात या सर्व मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे.
मुंबई शेगाव आणि पुणे शेगाव ही ट्रेन धावणार असून ती भुसावळ मार्गे धावू शकते. देशातील महत्वाच्या स्टेशनपैकी भुसावळ स्टेशनचा देखील समावेश आहे. या स्थानकावरून दररोज शेकडो प्रवाशी गाड्या धावतात. अद्यापही भुसावळ मार्गे वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसून भुसावळकर या ट्रेनच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकते. सध्या वंदे भारत एक्प्रेसने रोज ३४ हजार प्रवाशी प्रवास करत आहेत. या रेल्वेचा सरासरी वेग १२० किलोमीटर प्रतितास आहे.