जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२१ – शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या चोखामेळा वसतिगृहाजवळ एका स्पर्धा परिक्षा क्लासेसवर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. दरम्यान कारवाईबाबत एमआयडीसी पोलीसांशी संपर्क साधला असता प्रत्येकाकडून वेगवेगळी कारणे मिळाल्याने काहीतरी आर्थिक साटेलोटे झाल्याचा संशय व्यक्त होता. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना याबाबत कळताच त्यांनी पथकाला आणि मनपाला याबाबत कळविले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक निर्बंध लागू केले आहेत. क्लासेस सुरू ठेवण्यावर शासनाने बंधने घातली आहेत, असे असतानाही जळगाव शहरातील चोखामेळा वसतिगृहाजवळ स्पर्धा परीक्षा क्लासेस सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि काही कर्मचारी त्या ठिकाणी कारवाईसाठी पोहोचले. पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई देखील केली.
पोलिसांच्या कारवाईत एकवाक्यता नाही
दरम्यान, या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चर्चा केली असता त्यांच्याकडून वेगवेगळी उत्तरे ऐकण्यास मिळाली. सदर क्लासेसवर कारवाई करण्यासाठी गेलो असता विद्यार्थी नव्हते मात्र क्लासचे संचालक विना मास्क असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, आम्ही कारवाईसाठी गेलोच नव्हतो अशी वेगवेगळे उत्तरे एमआयडीसी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या उत्तरामुळे एमआयडीसी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केला जात आहे. काही दिवसांपूर्वी देखील सिंधी कॉलनीत जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती मात्र तेव्हा देखील ते व्यक्ती विना मास्क असल्याचे सांगत पोलिसांनी वेळ मारून नेली होती.
अपर पोलीस अधिक्षकांनी घातले लक्ष
पोलिसांच्या कारवाईबाबत अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांना कळताच त्यांनी सविस्तर माहिती घेतली. निर्बंध असताना क्लास सुरू ठेवल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलीस पथकाला पाठविले आणि मनपा पथकाला देखील सांगितले.