जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मे २०२१ । शहरातील जाखनी नगरात राहणाऱ्या तरुणाच्या वडिलांचे हृदयविकारामुळे वडीलांचे निधन झाले. त्यामुळे कुटूंबासह वडीलांच्या अंत्यविधीला नाशिक येथे गेलेल्या मुलाच्या घरात अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याचा प्रकार आज सकाळी १० वाजता उघडकीस आली.
कंजरवाडा परिसरातील जाखनी नगरात संदीप अशोक गारूंगे हे पत्नी नैना व आत्या बिंदीया रायचंदे यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते आत्या बिंदीया रायचंदे यांच्या मालकीच्या घरात राहतात. १० मे रोजी संदीप यांचे वडील अशोक गारूंगे यांचे हृदयविकारामुळे निधन झाले. त्यामुळे ते कुटूंबासह नाशिक येथे अंत्यविधीच्या कार्यक्रमाला गेले.
अंत्यविधी व दहाव्याचा कार्यक्रम आटोपून गारुंगे कुटूंब नाशिक येथेच थांबले. संदीप गारूंगे यांच्या घरी नेहमीप्रमाणे घरकाम करणारी तरूणी अश्विनी सोनार ही सकाळी १० वाजता आली. त्याच वेळी बिंदीया रायचंदे यांनी तिला संपर्क साधला व घराबाबत चौकशी केली. त्यावेळी अश्विनी हिला घराच्या स्वयंपाक घराचा दरवाजा उघडा दिसला. ही माहिती त्यांना दिली. बिंदीया यांनी त्यांच्या चुलत बहिण मेनका इंद्रेकर यांना तात्काळ त्यांच्या घरी जाण्यास सांगितले. त्यानुसार मेनका यांनी जाखनी नगर गाठले व घराची पाहणी केली. त्यावेळी त्यांना शोकेस व कपाटातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. तसेच घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला आढळून आला.
६५ हजारांचा ऐवज लंपास
चोरट्यांनी घरात कुणीही नसल्याची संधी साधत १० ग्रॅम वजनाची सोन्याची बोरमाळ, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रॅम वजनाची सोन्याचे टॉप्स तसेच २० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैजण व पंचवीस हजार रूपयांची रोकड असा एकूण ६५ हजारांचा ऐवज लंपास केला आहे. संदीप गारूंगे यांनी जळगाव गाठत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.