जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑक्टोबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरीच्या घटना प्रचंड वाढल्या आहे. चोरट्यांना एकप्रकारे पोलिसांचा धाकच उरला नाहीय. अशातच जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात ठेवलेली रोकड आणि दागिने लंपास केल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटनेनंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नेमका प्रकार काय?
शहरातील पिंप्राळा परिसरामधील सेंट्रल बँक कॉलनीमध्ये वास्तव्यास असलेले प्रशांत गणेश माहोरे हे ३ ऑक्टोंबर रोजी त्यांची आजी वारल्याने ते कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेले होते. काही दिवस त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून त्यांच्या घरातील रोकड आणि सोने चांदीच्या दागिने असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवून नेला.
दि. ५ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास गणेश माहोरे हे घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना लहान भावाने फोन करुन घरात चोरी झाल्याचे सांगितले. त्यामुळे गणेश माहोरे यांनी घराकडे धाव घेतली. घरी आल्यानंतर माहोरे यांना घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चार जणांनी ही घरफोडी केल्याची माहिती रामानंद नगर पोलिसांना मिळताच संशयित सागर राजाराम गवई (वय २३, रा. पिंप्राळा हुडको), अब्रार अमित खाटीक (वय १८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख इकबाल (वय २२, दूध फेडरेशन हुडको) व अमोल प्रकाश शिरसाठ (वय २५, रा. दूध फेडरेशन हुडको) यांच्या मुसक्या आवळल्या.