जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चाललीय. अशातच जळगाव शहरामधील एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट नगरात ट्रॅक चालक सागर रमेश पालवे (वय-२५ रा. मालदभाडी ता. जामनेर) या तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आलीय. मुलीसोबत बोलत असल्याचा रागातून सागरला मुलीच्या बापासह एकाने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून ठार केलं. याबाबत तरुणाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून २ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर तालुक्यातील मालदाभाडी येथे वास्तव्यास असलेला सागर पालवे हा गेल्या चार ते पाच वर्षांपासून ते जळगाव येथील ट्रान्सपोर्ट नगरातील विदर्भ ट्रान्सपोर्ट कंपनीत ट्रकचालक म्हणून कामाला होता. त्याच्यासोबत निलेश गोळवे व पिंटू महाजन हे देखील काम करतात.
सागर पालवे हा गेल्या काही दिवसांपासून सोबत काम करणाऱ्या पिंटू महाजन यांच्या मुलीसोबत बोलत होता. या रागातून पिंटू महाजन याने निलेश गोळवे याला सोबत घेऊन गुरुवार ७ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास त्याला बेदम मारहाण केली. यावेळी दोघेजण मारहाण करत असताना सागरने त्याच्या आईला फोन लावला व मला दोघेजण मारहाण करत असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते आणि फोन कट केला होता. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता ट्रान्सपोर्टचे मालक विकास लगडे यांनी सागरच्या आईला फोन करून त्यांना जळगाव सिव्हिल हॉस्पिटल येथे बोलवून घेतले.
दरम्यान मुलाचा मृतदेह पाहून आई नीलम पालवे यांनी हंबरडा फोडला होता. मुलाला मारहाण करून त्याला ठार केल्याच्या आरोप देखील त्यांनी केला होता. त्यानुसार त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार रात्री उशिरा संशयित आरोपी निलेश गुळवे आणि पिंटू महाजन या दोघांविरोधात मारहाण करून खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मृत सागर पालवे यांच्या पश्चात आई नीलम, वडील रमेश व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.