जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । जुलै, ऑगस्ट महिन्यातील महागाईने कळस गाठला असून भाजीपाल्यापासून ते सर्वच वस्तू, खाद्यपदार्थ महागले. यात फक्त खाद्यतेलाने आग ओतली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात खाद्यतेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न ग्राहकांना आतापासूनच पडत आहे.
सध्या खाद्यतेलाच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळत आहे. सध्या सणासुदीच्या काळात खाद्यतेलाचा भडका उडणार नसला तरी डिसेंबरनंतर खाद्यतेलाचे भाव भडकण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे यंदा देशात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीनसह इतर तेलवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. खरीपातील तेलबिया वर्गीय पीकाचे उत्पादन घटू शकते यामुळे खाद्यतेल महागण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी मार्च-एप्रिलपर्यंत चढ्या दराने खाद्यतेलाची विक्री होऊ शकते. या काळात उत्पादन घसरल्याचा फटका बसू शकतो. या काळात उत्पादन कमी झाल्याने दरवाढ होऊ शकते.
डिसेंबरपासून वाढतील दर
भारतीय हवामान विभागानुसार, देशातील 717 पैकी 287 जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 4 ऑगस्ट या दरम्यान पावसाचे प्रमाण घसरले आहे. पाऊस कमी झाल्याने तांदळासह इतर अनेक पिकांना फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत ग्राहकांना खाद्य तेलासह इतर वस्तूंसाठी अधिक खर्च करावा लागू शकतो. केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्यास त्यावेळी पण भाव कमी होऊ शकतात.