जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२३ । राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाने चांगलीच दडी मारली असून यामुळे शेतकऱ्याचा खरीप हंगाम पावसाअभावी वाया जाण्याच्या मार्गावर आहे. दुसरीकडे ऐन पावसाळ्यात उन्हाळ्याचे चटके बसू लागले आहे. एरवी ऑक्टोबर महिन्यात ऑक्टोबर हीट जाणवते.
जळगाव जिल्ह्यामधील अनेक तालुक्यामध्ये जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाऊस सुट्टीवर गेला. पावसाने तब्बल तीन आठवड्याची विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांनी माना टाकल्या आहेत तर दुसरीकडे तापमानात देखील वाढ झाली आहे.
विशेषत: सकाळी १० वाजेपासूनच जळगावकरांना उन्हाचे चटके बसू लागले. दुपारी १२ वाजेपासून रखरखीत ऊन ४ वाजेपर्यंत कायम राहत आहेत. उकाडा वाढण्यात ऐन पावसाळ्यात एसी, कुलर पुन्हा सुरु झाले आहे. रात्री देखील उकाडा जाणवत आहे. श्रावण महिन्यात पावसाने मोठी विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरींऐवजी घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत.
गेल्या चार ते पाच दिवसात तापमानात वाढ होऊन जळगावातील तापमान ३४ अंशांवर गेले आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील शेतकऱ्यांची पिके करपू लागली आहेत. तर दुसरीकडे विहिरींनी तळ गाठल्याने जेमतेम वाढलेली पिके जगवायची तरी कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. येणाऱ्या काही दिवसांत जर पाऊस झाला नाही तर शेतकऱ्यांची अवस्था वाईट होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.