जळगाव लाईव्ह न्यूज| २३ ऑगस्ट २०२३। महिलांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्यासाठी लोकनायक महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान, युगंधरा फाउंडेशन व सेवा सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील जय बाबाजी चौक परिसरात महिलांसाठी ‘महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मिती’ या लघुउद्योगातून उपक्रम सुरु करण्यात आला आहे . तयार कपड्यांचे युनिट तयार करण्यात आले असून, यात महिलांना स्वयंरोजगाराचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे.
मागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या या स्वयंरोजगार उद्योगाने आता छोट्या मोठ्या खासगी कंपन्यांबरोबर व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून महिलांना स्वयं रोजगारासाठी अतिशय फायदा होत आहे. येथे शिलाई, कटिंग मास्टर आणि नावीन्यपूर्ण डिझाइन तयार करणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिलेल्या ऑर्डरची पूर्तता करताना आपल्या मनातील चांगल्या डिझाइन तयार करून घेत प्रशिक्षित महिला आज ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
या स्वयंरोजगार उद्योगाच्या पुढील टप्प्यामध्ये जिल्ह्यातील खासगी कंपन्यांच्या मार्फत वेगवेगळ्या कामाच्या ऑर्डर स्वीकारण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, आवश्यक अत्याधुनिक प्रशिक्षणही या माध्यमातून दिले जाणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील निराधार तसेच दिव्यांग महिलांसाठी मीनाक्षी निकम यांनी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून दिला आहेत. आता पुन्हा सुचित्रा पाटील तसेच स्मिता बच्छाव यांनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून महिलांचे सशक्तिकरण व सक्षमीकरणाची चळवळ हाती घेतली आहे. यामुळे महिलांच्या हाताला काम मिळणार असून, तालुक्यात रोजगार निर्मितीही होणार आहे.
“‘महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मिती’ या स्वयंरोजगार प्रशिक्षणातून महिलांना उद्योग व रोजगार मिळत असून, व्यापक चळवळ राबविण्यात येणार असल्याचा मानस आहे.” – सुचित्रा पाटील अध्यक्षा, हिरकणी महिला मंडळ
“शहरासह ग्रामीण भागातील महिलांचे एकत्रिकरण करून त्यांच्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध करून देत ‘कमवा व शिका’ या चळवळीतून महिला सशक्तिकरण व सक्षमीकरण सर्वदूर राबविणार.” – स्मिता बच्छाव संस्थापिका, युगंधरा फाउंडेशन