जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। जिल्हा नियोजन मंडळाकडून महापालिकेला सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार व नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून साधारण ३१ कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला आहे. यात पाच प्रभागांत दलितेत्तर वस्ती, तर उर्वरित प्रभागांत दोन योजनेतून विकासकामे होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला समसमान निधीवाटप करण्यात येणार आहे.
शेवटच्या महासभेत हे सर्व प्रस्ताव मंजूर होणार असून, नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी शुक्रवारी (ता. ४) केले. महापालिकेतील महापौरांच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महापौर महाजन म्हणाल्या, की महापालिकेला जिल्हा नियोजन मंडळाकडून शहराच्या विकासासाठी हक्काचा निधी मिळाला आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून नऊ कोटी ८८ लाख, नागरी दलितेत्तर वस्ती सुधार योजनेतून पाच कोटी ३६ लाख रुपये, नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत १४ कोटी ४९ लाख रुपये मिळाले आहेत. प्रभाग एक, तीन, चार, दहा व १३ मध्ये हा निधी वापरण्यात येणार आहे. या प्रभागांत १५ कोटींच्या निधीचे समसमान वाटप होईल.
उर्वरित प्रभागांत दलित नागरी व महाराष्ट्र सुवर्ण जयंती योजनेच्या १५ कोटींतून विकासकामे होणार आहेत. ५२ नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील ३० लाख रुपयांपर्यंतचे व नगरसेवक विकास निधीतून २५ लाख रुपयांचे विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. ज्या भागात विकासकामे झालेली नाहीत, त्या भागातील प्रस्ताव सादर करावेत. खेडी, सागरनगर, शिंदेनगर, बोरसे कॉलनी, उस्मानिया पार्क, वीर सावरकरनगर या भागांतील प्रस्ताव नगरसेवकांनी सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १७ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. यावर महापौर म्हणाल्या, की महापालिकेची आता शेवटची महासभा होणार आहे. त्यामुळे विकासकामांचे प्रस्ताव आपल्याकडे नगरसेवकांनी त्वरित सादर करावेत. ते महासभेत मंजूर करून नियोजन मंडळाकडे पाठविण्यात येतील.
या सर्व प्रक्रियेत तीन महिने लागतील. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन विकासकामे सुरू होतील. अचानक निवडणूक लागून अचारसंहिता जारी झाली. तरीही विकासकामे सुरूच राहतील. त्यामुळे नगरसेवकांनी लवकर प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.