जळगाव लाईव्ह न्यूज | ४ ऑगस्ट २०२३ | भडगाव तालुक्यातील सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी हजारोच्या संख्येने भडगाव तालुक्यातील ग्रामस्थांनी पोलीस स्टेशनवर मूक मोर्चा काढला.
दुसरीकडे या घटनेचे पडसाद आज विधानसभेतही उमटले. आमदार किशोर पाटील यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासारखा चांगला वकील देऊ, असं आश्वासन त्यांनी दिलं. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पिडीत मुलीच्या कुटुंबियांशी संपर्क साधत दोषीवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
भडगाव तालुक्यातील या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या घटनेबाबत पाचोरा भडगाव तालुका मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनीही आज अधिवेशानात संशयिताला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. दुसरीकडे या घटनेतील दोषीला फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी आज भडगाव पोलीस स्टेशनवर विराट मुक मोर्चा काढण्यात आला. जोपर्यंत आरोपीला फाशीची शिक्षा होत नाही, तोपर्यंत याठिकाणाहून जाणार नाही, असा पावित्रा मोर्चात सहभागी पिडीतेच्या कुटुंबियांनी तसेच ग्रामस्थांनी घेतला. त्यावर या मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमीत पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पिडीतेच्या कुटुंबियांचे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं करुन दिलं.
फोनवर मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरुन बोलतांना सांगितलं की, विधानसभेच्या अविधेशनात आमदार किशोर पाटील यांनी प्रश्न मांडला, त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. आरोपीला अटक झाली आहे, तो सुटणार नाही, यासाठी व्यवस्था आपण केली असून विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासारखा चांगला वकील देऊ. संबंधितावर कठोर कारवाई होईल..एकदम कडक कारवाई होईल, असं आश्वासन दिलं. यावेळी पिडीत चिमुकलीच्या काकूने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतांना रोष व्यक्त केला, तुम्ही कधी वकील लावणार, कधी कारवाई करणार, त्यापेक्षा संशयित आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही आमचं काय करायचं बघून घेऊ …असा रोष बोलताना व्यक्त केला.