जळगाव लाईव्ह न्यूज । २० जुलै २०२३ । गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात संततधार पावसाला सुरुवात झाली आहे. काल बुधवारी राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळेल. जळगाव जिल्ह्यात देखील दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला.
दरम्यान, पुढील ५ दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहणार, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. राज्यात पुढील ५ दिवस पावसाचा जोर वाढणार असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना देण्यात आलेला ‘ऑरेंज अलर्ट’ कायम ठेवला आहे. यासोबत पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांनाही ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या सर्व जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
जळगावात दमदार हजेरी :
जळगाव जिल्ह्यात पावसाळ्याचा दीड महिना उलटला तरी देखील पावसाने दमदार हजेरी लावली नव्हती. मागील काही दिवसापासून मधून मधून रिपरिप पाऊस पडत होता. मात्र काल बुधवारी जिल्ह्यात दिवसभर संततधार सुरु होती. रावेर, यावल आणि मुक्ताईनगर तालुक्यातील काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला होता.दरम्यान, जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.