समृद्धीवरील बस अपघातप्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर, अपघाताचे कारण आले समोर?
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२३ । गेल्या आठवड्यात महाराष्ट्राला हादरवून सोडणारी एक घटना घडली होती. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ विदर्भ ट्रॅव्हल बसचा अपघात होऊन यात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. आता या अपघातप्रकरणी आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे. बुलढाणा बस अपघातात बसचा चालक दारूच्या नशेत होता, असे अहवालात उघड झाले आहे. शेख दानिश असं बस चालकाचे नाव आहे.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, अमरावती (Amravati) येथील रीजनल फॉरेंसिक सायन्स लँबोरिटिने यासंदर्भातला फॉरेन्सिक तपास केला आहे. चालकाच्या रक्ताच्या नमुन्याच्या अहवालात चालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे. रक्तामध्ये अल्कोहोल असल्याचा पुरावा आढळला आहे. या खुलाशाने एकच खळबळ उडाली आहे.
विदर्भ ट्रॅव्हल क्र. MH29 BE1819 मधून या 25 प्रवाशांसाठी शेवटचा प्रवास ठरला. ही बस समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून पलटी झाली. यानंतर लगेचच बसने पेट घेतला. हा अपघात घडताच ड्रायव्हर आणि कंडक्टरसह 5 ते 6 प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले. यामुळे या भीषण अपघातातून ते बचावले. मात्र, इतर 25 जणांचा बसमध्येच होरपळून मृत्यू झाला.